अमित ठाकरे यांचे कोरोनावरुन मेसेज व्हायरल करणाऱ्यांना आवाहन


मुंबई – सध्या देशात कोरोनाने थैमान घातले असून महाराष्ट्रासह अनेक राज्यांना याचा फटका बसला आहे. कडक निर्बंध महाराष्ट्रात लावण्यात आले असून दिल्लीसोबत इतर अनेक राज्यांनीही कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यातच एककीकडे कोरोनाबाधितांची वाढती संख्या तर दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये बेड्स, व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक राज्यांनी यासाठी केंद्राकडे मदतही मागितली आहे.

दरम्यान काल दिवसभरात राज्यात ६८ हजार ६३१ कोरोनाबाधित वाढले असून, ५०३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.५८ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ६० हजार ४७३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, राज्यात काल एकूण ६,७०,३८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

याच दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी एक सर्वाना हात जोडून एक कळकळीची विनंती आहे, आपल्या व्हाट्सआप, फेसबुकवर ‘कृपया’ मरणाच्या बातम्या, स्मशानातील फोटो, व्हिडीओ, शवागरातील मृतदेहांचा खच असलेले फोटो, व्हिडीओ कृपा करून शेअर करू नका, तुम्हाला आले तर ते एक तर तुमच्याकडेच ठेवा अन्यथा डिलीट करा, पण व्हायरल करून लोकांच्या मनातील भीती आणखी वाढवू नका, असे आवाहन केले आहे.

त्याचबरोबर जर काही व्हायरल करायचेच असेल तर काही आश्वासक, आत्मविश्वास आणि सकारात्मक असे काही तरी व्हायरल करा कारण या सततच्या ‘कोव्हीड’ आणि त्याच्या भडक, ठळक बातम्यांनी लोके आधीच खचली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.