देशातील लॉकडाऊनवर अमित शहांचे मोठे वक्तव्य


नवी दिल्ली – देशातील परिस्थिती कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमुळे गंभीर बनली आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून विक्रमी रुग्णवाढ होत असून, बेडसह इतर मुलभूत आरोग्य सुविधांअभावी रुग्णांचे अतोनात हाल होत असल्याचे चित्र दिसत आहे. या परिस्थितीमुळे पुन्हा देशात पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीत लॉकडाऊनच्या चर्चेवर मोठे वक्तव्य केले आहे.

टाइम्स नाऊ वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अमित शहा यांनी कोरोनासह देशातील विविध मुद्द्यांवर केंद्र सरकारची भूमिका मांडली. देशात कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाल्यामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन लावण्याबद्दल केंद्राच्या भूमिकेबद्दल शहा यांना प्रश्न विचारण्यात आला. शहा त्यावर बोलताना म्हणाले, तीन महिन्यांपूर्वीच राज्यांना स्वतः निर्णय घेण्याचे अधिकार केंद्र सरकारने दिले आहेत.

राज्यांना लॉकडाऊनसारखे उपाय आपापल्या पातळीवर घ्यावे लागतील, कारण विविध राज्यातील परिस्थिती वेगवेगळी असल्यामुळे राज्यांनीच स्वतः निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेणे योग्य राहिल. गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्राने कोरोनाशी लढा देण्यासाठी मुलभूत सुविधा उभारल्या असल्याचे सांगत शहा यांनी राष्ट्रीय लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरून केंद्राने लक्ष हटवल्याच्या आरोपावर बोलताना अमित शहा म्हणाले, असे म्हणणे चुकीचे आहे. केंद्र कोरोनाविरोधातील लढ्यात कुठेही कमजोर पडलेले नाही. कोरोना परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. त्याचबरोबर मृत्यूदरही कमी आहे. फक्त भारतातच दुसरी लाट नाही, तर अनेक देशांमध्ये आलेली आहे. कोरोनाविरोधी लढाईलाच केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.

कोरोनासंदर्भातील नियम कुंभ असो किंवा रमजान असो कुठेही पाळल्याचे दिसून आले नाही. असे वागणे चुकीचे असल्यामुळेच आम्ही आवाहन केले आणि आता कुंभमेळा प्रातिनिधिक पद्धतीने साजरा करावा. सध्या ज्या वेगाने कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे, त्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. पण या दुसऱ्या लाटेविरोधातील लढाई आपण जिंकू, असा मला पूर्ण विश्वास असल्याचे शहा म्हणाले.