कोविड ऑक्सिजन संकटात स्टील उद्योगांचा सहकार्याचा हात

कोविड १९ दुसऱ्या लाटेने जोर केला असताना देशभरात वैद्यकीय ऑक्सिजनची भासत असलेली कमतरता भरून काढण्यासाठी देशातील उद्योजकांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. देशातील बहुतेक बडे स्टील प्लांट राज्ये, हॉस्पिटल साठी ऑक्सिजन उत्पादन करू लागले आहेत. मुकेश अंबानी यांनी त्यांच्या जामनगर तेलशुद्धीकरण कारखान्यातून महाराष्ट्राला दररोज १०० टन ऑक्सिजन पुरवठा मोफत करायला सुरवात केली आहे. त्यापाठोपाठ टाटा स्टील, जिंदल, अर्सेलर मित्तल निप्पन स्टील, सेल यांनीही देशात ऑक्सिजनची कमतरता भासत असलेल्या राज्यांना ऑक्सिजन पुरवठा सुरु केला आहे.

टाटा स्टीलने या संदर्भात रविवारी ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार राज्यांच्या मागणीनुसार दररोज २०० ते ३०० टन ऑक्सिजन पुरविला जात आहे. जिंदल म्हणजे जेएसडब्ल्यू स्टील महाराष्ट्राला दररोज १८५ टन ऑक्सिजन पुरवत आहे. कंपनी अधिकाऱ्यांनी ट्विटवरून दिलेल्या माहितीनुसार कोविड १९ चा वेगाने फैलाव होऊ लागल्याने कारखान्यात ऑक्सिजन उत्पादन करून राज्यांना पुरविला जात आहे. जिंदलने ओरिसा व छतीसगढ़ राज्यांना अनुक्रमे १०० व ५० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरविला आहे.

अर्सेलर मित्तल गुजराथ राज्याला २०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवीत आहे. केंद्रीय पोलाद मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार कोविड १९च्या सुरवातीपासून आजपर्यंत देशातील स्टील उद्योगाने १.३०,००० टनापेक्षा अधिक ऑक्सिजन पुरवठा केला आहे. सेल ने आत्तापर्यंत ३३३०० टन पुरवठा केला आहे. देशातील २८ ऑक्सिजन संयंत्रे रोज १५०० टन ऑक्सिजनचा पुरवठा करत आहेत.