देशातील सर्वाधिक काळ सैन्य पेन्शन घेणाऱ्या बचनकौर यांचे निधन

लष्करी पेन्शन सर्वाधिक काळ घेण्याचे रेकॉर्ड केलेल्या बचन कौर यांचे नुकतेच निधन झाले त्या ११६ वर्षांच्या होत्या. त्यांना तब्बल ७६ वर्षे ही पेन्शन मिळाली. बचन कौर यांचे पती ब्रिटीश शासन काळात सेनेत भरती झाले होते. त्यावेळी ते बलुचिस्तान येथे होते. गमरजीवन सिंह असे त्यांचे नाव होते आणि त्यांनी दोन्ही महायुद्धात भाग घेतला होता. आर्टिलरी रेजिमेंट मधून ते २० वर्षे नोकरी करून निवृत्त झाले होते. १७/१२/१९४५ मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली तेव्हा त्यांना दरमहा १० रुपये पेन्शन मिळत असे.

गमरसिंग यांचा मृत्यू १९९१ मध्ये ते १०१ वर्षाचे असताना झाला. त्यांच्या निधना नंतर बचनकौर याना ३५०० रुपये पेन्शन मिळत होती आणि आत्ता दरमहा २४ हजार रुपये पेन्शन मिळत होती. बचन कौर याना ९ मुले. पैकी सुबेदार प्रीतमसिंग सुद्धा लष्करातून निवृत्त झाले असून त्याचे वय ७९ वर्षाचे आहे. त्यांचा मुलगाही लष्करातून निवृत्त झाला असून त्यालाही पेन्शन मिळते.

सुबेदार प्रीतमसिंह यांच्या म्हणण्यानुसार बचन कौर यांचा जन्म वास्तविक १८९९ मधला आहे म्हणजे त्या १२२ वर्षाच्या होत्या. पण १९०५ अशी जन्मतारीख भारतीय सेनेकडे नोंद आहे. १८९९ च्या जन्मतारखेचा कागदोपत्री पुरावा देता आला नसल्याने १९०५ हेच त्यांचे जन्मवर्ष मानले गेले होते. त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या असेही प्रीतम सिंह यांचे म्हणणे आहे.