ई कॉमर्स व्यवसाय कोविड काळात दुपटीने वाढला

देशात कोविड १९ संक्रमणाचा वेग प्रचंड वाढत असतानाच दुसरीकडे या काळात ई कॉमर्स कंपन्याच्या व्यवसायात दुपटीने वाढ दिसू लागली आहे. अनेक शहरात रात्रीची संचारबंदी, वीकएंड लॉकडाऊन अश्या बंधनांमुळे फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अमेझॉन, बिग बास्केट या सारख्या ई कॉमर्स कंपन्यांकडे ग्राहकांच्या कडून वस्तूंची प्रचंड मागणी आहे. मागणीचा पुरवठा वेळेत करण्यासाठी या कंपन्यांनी डिलीव्हरी बॉयची भरती मोठ्या प्रमाणावर सुरु केली असल्याचे समजते.

बिग बास्केटचे राष्ट्रीय प्रमुख सेषु कुमार तिरुमला म्हणाले, महाराष्ट्र, दिल्ली व अन्य राज्यातील मोठ्या शहरातून खाद्यान्न, तेल, फळे, भाज्या, डेअरी उत्पादने यांच्या खूप ऑर्डर येत आहेत. फ्लिपकार्ट, अमेझॉन यांनी डिलीव्हरी बॉय संख्या वाढविली असून कोविड १९ विरुद्ध लढाईत ई कॉमर्स कंपन्या ग्राहक सेवा देऊन महत्वाची भूमिका बजावत आहेत. अर्थात या कंपन्यांना काही ठिकाणी राजकीय दबावाला सामोरे जावे लागत आहे असेही सांगितले जात आहे.

नुकत्याच झालेल्या सर्व्हेक्षणात असे दिसले की सध्या २१ टक्के शहरी कुटुंबे जीवनावश्यक वस्तूंची ऑनलाईन खरेदी करत आहेत. मार्च महिन्यात हे प्रमाण १६ टक्के तर फेब्रुवारी मध्ये ११ टक्के होते. मागणी नुसार वेळेत पुरवठा करण्यासाठी डिलीव्हरी बॉय संख्या वाढवली तरी त्या कर्मचाऱ्यांची, विक्रेत्यांची  सुरक्षा आणि काळजी घ्यावी लागत आहे. सर्व साईट वारंवार साफ करायचे उपाय योजावे लागत आहेत असेही सांगितले जात आहे.