कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राहुल गांधींनी रद्द केल्या सर्व निवडणुक प्रचार सभा


नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांमधील निवडणूक प्रचार सभा रद्द करण्याचा निर्णय घोषित केला आहे. अशा सभा कोरोना काळात घेणे धोकादायक असून, अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही तसा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पश्‍चिम बंगालमध्ये अजून तीन टप्प्यांच्या निवडणुकीचा प्रचार बाकी आहे.

तेथील हे टप्पे रद्द करून एकाच दिवशी सारे मतदान उरकून टाका, अशी सूचना तृणमूल कॉंग्रेसने निवडणूक आयोगाला केली होती. पण ती सूचना निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. मोदी, शहा यांच्यासह भाजपचे अनेक नेते तसेच ममता बॅनर्जीही बंगालमध्ये जोरदार प्रचार करीत आहेत. त्यासाठी मोठी गर्दी जमवली जात असून, कोरोना काळात अशी गर्दी जमवणे धोकादायक असल्यामुळे राहुल गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे.

अन्य पक्षाच्या राजकीय नेत्यांची मात्र या पार्श्‍वभूमीवर आता गोची झाली असून, मोदी, शहा तसेच ममता आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर चांगले समर्थन केले जात आहे.