अभिनव बिंद्राने कुंभमेळ्याचे समर्थन करणाऱ्या योगेश्वर दत्तला फटकारले


नवी दिल्ली – कुंभमेळ्याच्या आयोजनावर भारताचा एकमेक वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता शूटर अभिनव बिंद्राने प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे. धर्मांमध्ये कोरोना व्हायरस कोणताही भेदभाव करत नसल्याचे सांगत, अभिनव बिंद्राने कोरोना संकटात कुंभमेळ्याच्या आयोजनावरुन नाराजी जाहीर केली आहे. कुंभमेळ्याचे समर्थन करणारे ट्विट कुस्तीपटू योगेश्वर दत्तने केल्यानंतर अभिनव बिंद्राने त्याला चांगलेच फटकारले आहे. हरिद्रारमधील कुंभमेळ्यात झालेल्या लाखोंच्या गर्दीमुळे देशात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कुंभमेळ्याचे समर्थन करताना कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने अप्रत्यक्षपणे निजामुद्दीने मकरजसोबत तुलना केली होती. ट्विट करत योगेश्वर दत्तने म्हटले होते की, कोणीही कुंभमेळ्यात बेकायदेशीरपणे प्रवेश करत नाही. लोक प्रोटोकॉलचे पालन करत आहेत. कोणीही तेथील सुरक्षारक्षक किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर थुंकत नाही. कोणीही प्रशासनापासून लपून पळत नसल्यामुळे कुंभमधील शांतीप्रिय भक्तांची बदनामी थांबवा.


अभिनव बिंद्राने यावर मुळात कुंभमेळ्याचे आयोजन करायला पाहिजे होते का अशी विचारणा योगेश्वर दत्तला केली आहे. मुळात कोरोना संकट देशात असताना कुंभमेळ्याचे आयोजन करण्याची गरज होती का? कोरोना धर्मांमध्ये भेदभाव करत नसल्याचे अभिनव बिंद्राने म्हटले आहे.

एवढ्यावरच अभिनव बिंद्रा थांबला नाही. सत्ताधारी भाजपचा सदस्या असणाऱ्या योगेश्वर दत्तमुळे संपूर्ण क्रिडा क्षेत्राला मान खाली घालायला लावली असल्याचे म्हटले आहे. सध्याच्या घडीला जीव वाचवणे, कोरोनावर उपाय शोधणे, कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांसाठी करुणा आणि सहानुभूती दर्शवणे गरजेचे असल्याचे त्याने म्हटले आहे.