जपानमधील नागोरो, अनोख्या बाहुल्यांचे गाव

dolls
जपानच्या शिकोकू प्रांतातील नागोरो हे गाव एका ६९ वर्षाच्या आजीमुळे बाहुल्यांचे गाव म्हणून प्रसिद्धीस आले आहे. अर्थात या मागची कहाणी कुणाच्याही डोळ्यांना पाणी आणणारी आहे मात्र या आजीने तिच्या अजब कृतीने या गावाकडे पर्यटकांना आकर्षून घेण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. गेली १६ वर्षे या आजीबाई करत असलेले प्रयत्न आता सार्थकी लागले असे म्हणता येईल. या गावाची लोकसंख्या अवघी २७ आहे मात्र त्याच्या दसपटीने म्हणजे २७० विविध आकाराचे, वयाचे पुतळे या आजीने गावात उभारले आहेत.

putale
६९ वर्षाची, आयनो सुकिनी नावाची ही आजी सांगते, आमच्या गावात सर्वात लहान वयाची व्यक्ती ५५ वर्षाची आहे. गावात तरुण नाहीत आणि लहान मुलेतर नाहीतच. एकेकाळी येथे ३०० लोक राहत होते. त्यावेळी वन खात्यात आणि धरणाचे बांधकाम सुरु होते त्यामुळे कामगार होते. येथील काम संपले आणि रोजगाराच्या शोधात लोक गाव सोडून शहरात गेले. त्यामुळे गाव ओसाड पडले. गावात कुणी आहे असे वाटावे आणि एकटेपणा दूर व्हावा म्हणून आयनो ने ठिकठिकाणी माणसाच्या आकाराच्या बाहुल्या बनवून त्या ठेवायला सुरवात केली.

children
ही कल्पना तिला सुचली ती शेतात उभ्या केलेल्या बुज्गावाण्यावरून. तिने घराच्या बागेत पाखरे येऊन नासधूस करू नयेत म्हणून तिच्या वडिलांसारखा दिसणारा पुतळा उभा केला आणि शेजारून जाणारया माणसाला तो पुतळा खरा वाटून त्याने हॅलो केले तेव्हा गावभर असे पुतळे उभे करण्याची कल्पना तिला सुचली. तिने बाजार, मैदान, बसस्टँड, चौक, शाळा, किराना दुकान अश्या ठिकाणी हे पुतळे बसविले आहेत. ती सांगते आमच्या गावात लहान मुले नाहीत त्यामुळे येथील शाळा ७ वर्षापूर्वी बंद झाली. पण मी शाळेत लहान मुलांचे पुतळे बसविले आहेत. मला एकटेपणा वाटला कि तेथे जाणून मी त्यांच्याशी खेळते, त्यांना शिकविते, त्यांना गोष्टी सांगते. आमच्या गावात आता जिवंत माणसांपेक्षा बाहुल्या अधिक आहेत.

vilalge
लाकडी काटक्या, वर्तमानपत्रे, इलॅस्टीक, कापड आणि लोकर यांचा वापर करून ती या बाहुल्या किंवा पुतळे बनविते. एक मोठी बाहुली बनविण्यासाठी तिला तीन दिवस लागतात. पश्चिम जपानच्या डोंगरी भागातील हे गाव आता व्हॅली ऑफ डॉल्स म्हणून प्रसिद्धीस आले असून जगभरातून पर्यटक येथे आवर्जून भेट देऊ लागले आहेत.

Leave a Comment