वॉटर प्युरीफायर खरेदी करताना


पिण्यासाठी शुद्ध पाणी ही जीवनावश्यक गरज आहे. नळाला येणारे पाणी भरून ते फिल्टर न करता पिण्याचे दिवस जाऊन, अलीकडे पिण्याच्या पाण्याद्वारे निरनिराळे आजार उद्भविण्याचे प्रमाण वाढले आहे. ह्या कारणास्तव वॉटर प्युरीफायर्सची मागणी वाढली असल्याचे दिसून येत आहे. आजकाल बाजारामध्ये अनेक तऱ्हेचे आणि निरनिराळ्या कंपन्यांचे वॉटर प्युरीफायर्स खरेदीसाठी उपलब्ध आहेत. एकीकडे नळाचे पाणी पिण्यालायक राहिले नसताना, दुसरीकडे अतिप्रगत वॉटर प्युरीफायर वापरून शुद्ध केलेले पाणी देखील शरीराला आवश्यक ती तत्वे मिळू देत नसल्याने हानिकारक ठरत आहे. अश्या वेळी प्युरीफायर खरेदी करताना कोणत्या प्रकारचा करावा ह्याचा विचार करणे अगत्याचे ठरते.

‘बीआयएस’, म्हणजेच ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस्’ च्या वतीने पिण्याचे पाणी आणि पॅकेज्ड ( बाटलीबंद )पिण्याचे पाणी किती शुद्ध असावे ह्याची निश्चित मानके ठरविली आहेत. पिण्याच्या पाण्याची शुद्धता मापून पाहण्याकरिता टीडीएस ( टोटल डीझॉल्व्ड सॉलीड्स ), पीएच स्तर आणि पाण्याचा खारेपणा पहिला जातो. बीआयएस नुसार मानवी शरीर दर लिटर मागे कमाल ५०० मिलीग्राम पीपीएम ( पार्ट्स प्रति मिलियन ) टीडीएस सहन करू शकते. जर ही पातळी १००० पीपीएमच्या वर गेली, तर हे शरीराला अपायकारक ठरू शकते. पण सध्या प्रचलित असलेल्या आरओ सिस्टम्स मधून प्रतिलिटर १८ ते २५ पीपीएम एकूण डीझॉल्व्ड सॉलीड्स मिळत आहेत, जी अतिशय अल्प आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते हे प्रमाण प्रत्येक लिटर मागे १००-१५० मिलीग्राम असणे आवश्यक आहे. ज्या पाण्यामध्ये प्रतिलिटर ३०० मिलीग्राम टीडीएस असतील, त्या पाण्याची चव अतिशय चांगली लागते, तर ९०० मिलीग्राम प्रतिलिटर टीडीएस असणाऱ्या पाण्याची चव खारट लागते.

‘आरओ’, किंवा रिव्हर्स ऑस्मोसिस एक अशी शुद्धीकरण प्रक्रिया आहे, ज्यामध्ये प्रेशरद्वारे पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. ह्यामुळे पाण्यामध्ये मिसळलेल्या अशुद्धी, इतर हानिकारक वस्तूंचे कण, आणि धातूंचे कण पाण्यातून फिल्टर केले जातात. अश्या प्रकारच्या प्युरीफायर्सचा वापर अश्या ठिकाणी केला जावा जिथे पाण्यामध्ये टीडीएस अधिक आहे, म्हणजेच जिथे पाणी खारे आहे. तसेच जिथे बोअरवेलचे पाणी उपलब्ध आहे, किंवा तटीय क्षेत्रांमध्ये आरओ सिस्टम चा वापर केले जाणे जास्त चांगले. जिथे गोडे पाणी आहे, किंवा ज्या भागांमध्ये प्रदूषण कमी आहे अश्या ठिकाणी आरओच्या ऐवजी ‘यूव्ही’ ( अल्ट्रा व्हायोलेट )फिल्टर वापरणे चांगले. आर ओ सिस्टम द्वारे फिल्टर केलेले पाणी, त्यातील हानिकारक जीवाणूंचा नाश करते. तसेच ह्या सिस्टमने क्लोरीन आणि आर्सेनिक सारखी तत्वे देखील पाण्यातून काढून टाकली जातात. पण ह्याचे एक नुकसान असे, की आपल्या शरीराला आवश्यक असणारे क्षारही ह्या सिस्टममुळे पाण्यातून बाहेर टाकले जातात.

यू व्ही, म्हणजे अल्ट्रा व्हायोलेट किरणांचा वापर करून फिल्टर केलेले पाणी देखील त्यातील हानिकारक जीवाणू काढून टाकते. पण पाण्यामध्ये असलेले क्लोरीन किंवा अन्य रसायने ही सिस्टम साफ करू शकत नाही. त्यामुळे जिथे पाणी मुळातच प्रदूषण विरहित, किंवा गोड असेल, तिथेच हे फिल्टर काम करू शकतात. ‘यू एफ’, म्हणजेच अल्ट्रा फिल्टरेशन सिस्टम मध्ये एक ‘मेम्ब्रेन’ किंवा एक प्रकारची जाळी आते, जी पाणी शुध्द करण्यास सहायक असते. हे फिल्टर वापरण्यासाठी विजेची आवश्यकता नाही. पण आपण राहत असलेल्या भागामध्ये पाणी खारे असेल, किंवा दुषित असेल, तर ह्या फिल्टरचा फारसा उपयोग नाही. त्यामुळे आपण राहत असलेल्या भागामध्ये पाणी जसे असेल त्यानुसार फिल्टर खरेदी करावा.

Leave a Comment