असे आहेत ब्रिटनच्या राणीचे आहारनियम

queen
ब्रिटनचा शाही परिवार जगामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणून लौकिक मिळवून आहे. या घराण्याशी संबंधित बहुतेक सर्वच व्यक्तिमत्वे जगभरातील जनतेला परिचित आहेत. किंबहुना या परिवाराशी निगडित कोणतीही बाब नेहमीच चर्चेचा विषय ठरत आली आहे. या शाही परिवाराची प्रमुख असणाऱ्या राणी एलिझाबेथने नुकतीच वयाची ९२ वर्षे पूर्ण केली आहेत. आज या वयामध्येही आपल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडत अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना आवर्जून अपस्थित राहून जनमानसाशी संपर्कात राहणे पसंत करणारी राणी एलिझाबेथ, ब्रिटनचे अतिशय आवडते व्यक्तिमत्व आहे. राणी एलिझाबेथच्या जीवनशैलीपासून, ती परिधान करीत असलेले पोशाख, आभूषणे, यजमान म्हणून तिच्या महाली आयोजित होत असणारे निरनिराळे कार्यक्रम, समाज कल्याणकारी कार्यक्रमांमध्ये राणी एलिझाबेथ देत असलेले योगदान आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये तिचा उत्साही सहभाग या सर्व गोष्टींमुळे राणी एलिझाबेथचे व्यक्तिमत्व अतिशय खास आहे. राणीच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच तिने अंगीकारलेले आहारनियमही खासच म्हणावे लागतील.
queen1
राणी एलिझाबेथच्या आहारातून पास्ता, बटाटे आणि लसूण संपूर्णपणे वर्जित आहेत. अगदी एखाद्या शाही मेजवानीचा प्रसंग वगळता, पास्ता आणि बटाटे राणीच्या भोजनामध्ये समाविष्ट केले जात नाहीत. लसूणाला मात्र राणीच्या भोजनातून अजिबात फाटा देण्यात येत असतो. राणीच्या दिवसाची सुरुवात ‘अर्ल ग्रे’ चहा आणि बिस्किटांनी होते. त्यानंतर सकाळच्या नाश्त्यामध्ये राणी एलिझाबेथ ‘केलॉग्स स्पेशल के’ घेणे पसंत करते. राणीच्या दुपारच्या भोजनामध्ये ग्रिल्ड चिकन किंवा मासे यांचा समावेश असतो. त्याचबरोबर भाज्या आणि ताजे सॅलड आणि ताजी फळे असा दुपारच्या भोजनाचा मेन्यू असतो. राणीसाठी तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये कांद्याचा वापरही अतिशय मर्यादित प्रमाणामध्ये केला जातो.
queen2
राणीचे रात्रीचे भोजनही कमी अधिक प्रमाणामध्ये दुपारच्या भोजना प्रमाणेच असते. शाही मेजवानी असेल, तर त्यासाठी बनविण्यात येणारे पदार्थ देखील राणीच्या पूर्वसंमतीने बनविले जातात. रात्रीच्या भोजनाच्या वेळी एक ग्लास उत्तम शँपेनचे सेवन हा देखील राणीच्या दिनचर्येचा भाग आहे. आपल्या आहाराच्या बाबतीत इतके चोखंदळ असणाऱ्या राणी एलिझाबेथला चॉकोलेट बिस्कीट केक मात्र अतिशय प्रिय आहे. हा केक राणीच्या भोजनामध्ये दररोज समाविष्ट केला जातो. इतकेच नव्हे, तर काही कार्यक्रमांच्या निमित्ताने राणी एलिझाबेथ प्रवासास बाहेर जात असल्यास एका शाही शेफला राणीचा आवडता केक घेऊन रवाना करण्यात येते. असा आहे राणी एलिझाबेथचा शाही थाट !

Leave a Comment