द लॅन्सेट या सायन्स नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आले कोरोना हवेतून पसरत असल्याचे प्रबळ पुरावे


नवी दिल्ली : कोरोना व्हायरस हा हवेतून पसरत असल्याचे प्रबळ पुराव्यातून सिद्ध झाल्याचे संशोधन द लॅन्सेट या सायन्स नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आले आहे. शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधनात असे सांगण्यात आले आहे की कोरोना हवेतून परसत आहे आणि त्याचे पुरावे सातत्याने संशोधकांना मिळत आहेत.

कोरोना हवेतून पसरत असल्यानेच जगभरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थांना त्याच्यावर अद्याप नियंत्रण ठेवता येणे शक्य झाले नसल्याचे ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडा या देशातील सहा तज्ज्ञांनी सांगितले आहे. हवेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार हा होतो या दाव्यासाठी या संशोधानात दहा ओळींचे पुरावे देण्यात आले आहेत.

असेही या अहवालात सांगण्यात आले आहे की, बाहेरच्या वातावरणापेक्षा घरातील वा बंदिस्त वातावरणात कोरोनाचा प्रसार जास्त होत आहे. पण घरी योग्य ती वेन्टिलेशन व्यवस्था असेल तर तो धोका कमी आहे. तसेच लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ही एकूण रुग्णांपैकी 40 टक्के असल्याचा दावाही यात करण्यात आला आहे. काही वैज्ञानिकांनी या आधीही दावा केला आहे की प्रामुख्याने हवेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार हा होतो. पण त्यांच्या हा दावा सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते पुरावे नव्हते.

32 देशांच्या 200 पेक्षा अधिक वैज्ञानिकांनी गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेला एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये सांगितले होते की, कोरोनाचा प्रसार हा हवेच्या माध्यमातून होतो. डोळ्याला न दिसणाऱ्या कणांमुळे लोकांमध्ये कोरोनाचा प्रसार होत आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने आणि जगभरातल्या देशांच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थांनी द लॅन्सेन्ट या सायन्स नियतकालिकेत प्रसिध्द झालेल्या या अभ्यासावर विचार करावा आणि हवेच्या माध्यमातून होणारा कोरोनाचा प्रसार कसा थांबवता येईल, त्यावर उपाययोजना कराव्यात, असे मत काही संशोधकांनी व्यक्त केले आहे.