कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नरेंद्र मोदींची कुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती


नवी दिल्ली : काल दिवसभरात देशात तब्बल 2.34 लाख कोरोनाबाधितांची नोंद झाल्यामुळे देशातील कोरोना परिस्थिती चिंताजनक बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर हरिद्वार येथे कुंभमेळ्यातील गर्दी आणि कोरोनाच्या प्रसाराचा धोका लक्षात घेत कुंभमेळा आटोपता घ्यावा अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखाडा परिषदेकडे केली आहे.

आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरून चर्चा केली. त्यामध्ये त्यांनी आतापर्यंत संतांनी प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. आतापर्यंत दोन शाहीस्नान झाले असल्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा आणि त्याची सांगता करावी अशी विनंती त्यांनी केली. त्यामुळे कोरोना विरोधातील लढ्याला बळ मिळेल, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

कोरोनाचा उद्रेक हरिद्वारमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यातही बघायला मिळत आहे. कुंभमेळ्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून अनेक आखाड्यांच्या साधू-संतांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे निरंजनी आखाडा आणि आनंद आखाडा या दोन आखाडयांनी 17 एप्रिल रोजीच कुंभ समाप्तीचा निर्णय घेतला आहे.

30 एप्रिलपर्यंत हरिद्वारमध्ये होणारा हा कुंभमेळा चालणार आहे. 30 एप्रिलला तिसरे शाहीस्नान होणार आहे. पण कोरोनाचा आकडा वाढत चालल्यामुळे या दोन आखाड्यांनी त्याआधीच कुंभसमाप्तीची घोषणा केली आहे. अर्थातच या आखाड्यांचा हा निर्णय त्यांच्या पुरता मर्यादित आहे. कारण 13 आखाड्यांची एकत्रित संस्था असलेली आखाडा परिषद याबाबत अंतिम निर्णय काय घेते हे महत्वाचे असेल. पण या दोन आखाड्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे इतरही पाच सहा आखाडे कुंभसमाप्तीची घोषणा करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

निरंजनी आखाड्याचे महंत नरेंद्रगिरी महाराज हे शाहीस्नानाआधीच कोरोना पॉझिटिव्ह होते, त्यांच्यावर हृषिकेशच्या एम्समध्ये उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे काल निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचं कोरोनामुळे निधन झाले. आता कुंभ मेळ्यातील आखाडा परिषद खुद्द पंतप्रधानांनी केलेल्या विनंतीवर काय निर्णय घेते ते महत्वाचे ठरणार आहे.