ही आहेत भयावह इतिहास असणारी काही इस्पितळे

hunted
जुन्यापुराण्या, पडीक इमातींमध्ये काही नकारात्मक शक्ती असल्याच्या कथा आपण नेहमीच ऐकत असतो, तर कधी नकारात्मक शक्तींचा प्रभाव असल्याने एखाद्या ठिकाणी लोकांचे येणे-जाणे बंद होऊन जाते आणि पाहता पाहता ते ठिकाण ओसाड होऊन जाते. त्या जोडीने नकारात्मक शक्तीच्या प्रभावाच्या कथाही असतातच, या कथांमुळे या ठिकाणी जाण्यासाठी कोणी धजावत नाही. जगामधील अनेक देशांमध्ये अशी ठिकाणे प्रसिद्ध आहेत. काही ठिकाणी मोठमोठे राजवाडे, तर काही ठिकाणी लहान घरे, उद्याने, इतकेच नाही, तर इस्पितळे देखील नकारात्मक शक्तींनी प्रभावित असल्याचे म्हणतात.
hunted1
इंग्लंडमधील लिंकनशायर या ठिकाणी उभ्या असलेल्या नॉकटन हॉल हॉस्पिटलबद्दल अनेक चित्रविचित्र कथा प्रसिद्ध आहेत. १८४१ साली हे हॉस्पिटल संपूर्णपणे जाळून खाक झाले होते. यानंतर या हॉस्पिटलचे पुनर्निर्माण करण्यात आले. नॉकटन हॉल हे वास्तविक ऑफिसर नॉर्मन हॉकसन यांच्या मालकीचे आलिशान घर होते. पण प्रथम विश्व्युद्धामध्ये जखमी जवानांच्या उपचारांसाठी नॉर्मन यांनी आपले घर प्रशासनाला देऊ केले होते. तेव्हापासून नॉर्मन यांचे निवासस्थान इस्पितळामध्ये परिवर्तीत झाले. युद्धानंतर नॉर्मन यांनी हे घर रक्षा मंत्रालयाला दिल्यानंतर येथे रॉयल वायुसेनेचे इस्पितळ बनविले गेले. तसेच इस्पितळातील कर्मचाऱ्यांसाठी या इमारतीच्या मागच्या बाजूला काही घरे देखील बनविण्यात आली. पण गल्फ युद्धामध्ये या इमारतीला पुन्हा हानी झाली आणि त्यानंतर हे इस्पितळ ओसाड झाले. आजही या इस्पितळाच्या खोल्यांमध्ये नकारात्मक शक्तीचा प्रभाव असल्याचे स्थानिक रहिवाश्यांचे म्हणणे आहे. तसेच मृत्युमुखी पडलेल्या अनेक सैनिकांचे आत्मे देखील येथे असल्याचे म्हटले जाते.
hunted2
सिंगापूरच्या चांगी शहरामध्ये ओल्ड चांगी हॉस्पिटल उभे आहे. हे हॉस्पिटल १९३५ साली रॉयल एअरफोर्सकरीता बनविले गलेले होते. त्यानंतर झालेल्या विश्वयुद्धामध्ये जपानी सैन्याने हे इस्पितळ आपल्या अधिपत्याखाली घेतले. या ठिकाणी युद्धामध्ये धरल्या गेलेल्या शत्रूच्या सैनिकांना मरणप्राय यातना दिल्या जात. अनेक सैनिक या यातनांपायी मरण पावले. युद्ध संपल्यानंतर या इमारतीचे नूतनीकारण केले जाऊन येथे पुनश्च इस्पितळाचे निर्माण करविले गेले, मात्र येथे मरण पावलेल्या सैनिकांचे आत्मे या इमारतीमध्ये असल्याच्या कथा प्रसिद्ध आहेत. म्हणूनच ही इमारत आता ओसाड आहे. या इमारतीमध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान चित्रपट कलाकारांना आणि संपूर्ण टीमला अतिशय विचित्र, भयावह अनुभव आले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आता या ठिकाणी केवळ नकारात्मक शक्ती येथे खरोखर आहेत किंवा नाहीत हे पाहण्यासाठी हौशी लोक येथे जात असतात.
hunted3
साऊथ कोरियाची राजधानी सेओल येथे असलेले गोंजीयम मानसोपचार इस्पितळ १९९० साली बंद करण्यात आले. येथे असणाऱ्या अनेक रुग्ण अचानक मृत्यू पावले. या रुग्णाच्या मृत्यूमागचे नेमके कारण डॉक्टरांना शोधून न काढता आल्याने हे इस्पितळ प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला. या इस्पितळामध्ये कार्यरत असणारा एक मानसोपचारतज्ञ रुग्णांना अनधिकृतरित्या आपल्या ताब्यामध्ये घेऊन त्यांच्यावर निरनिराळे भयंकर प्रयोग करीत असावा आणि त्या प्रयोगांच्यामुळे रुग्णांना मृत्यू येत असावा असा कयास लावला गेला होता. पण यामध्ये कितपत तथ्य आहे हे आजवरही स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण आज ही इमारत अगदी निर्जन, ओसाड असून येथे नकारात्मक शक्तींचा प्रभाव असल्याच्या आणि अनेकांना तसे विचित्र अनुभव आल्याच्या कथा येथे ऐकावयास मिळत असतात.

Leave a Comment