भारताकडून पाकिस्तानी क्रिकेटपटूंना टी-20 विश्वचषकासाठी मिळणार व्हिसा


नवी दिल्ली : भारतात ऑक्टोबर महिन्यात येण्यासाठी सज्ज असणाऱ्या बाबर आझम याच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या वाटेतील अडचणी दूर झाल्या असून या खेळाडूंना भारत सरकारकडून व्हिसा देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबतची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली. पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या व्हिसाचा प्रश्न सुटला आहे. पण, क्रिकेट सामने पाहण्यासाठी चाहते सीमा ओलांडू शकणार आहेत का, याबद्दल मात्र अद्यापही स्पष्टोक्ती नसल्याची माहिती गोपनीयतेच्या अटीवर बीसीसीआयशी संलग्न सूत्रांनी दिली आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही क्रिकेट संघांमध्ये बऱ्याच वर्षांपासून कोणताही क्रिकेटच सामना खेळला गेलेला नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव आणि काही राजकीय मुद्द्यांमुळे या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारी तेढ कायम आहे. पण, येत्या काळात मात्र परिस्थिती बदलण्याची चिन्हे आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार टी-20 विश्वचषक सामन्यांसाठी बीसीसीआयने नऊ ठिकाणांची पाहणी केली असून, याचा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहे. इतर सामन्यांसाठी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि धरमशाला या ठिकाणी असणाऱ्या स्टेडियमना पसंती देण्यात आली आहे.