घरामध्ये ह्या वस्तू ठेवल्यास होईल धनलाभ


आपल्या घराची रचना वास्तूशास्त्रानुरूप असणे ही पद्धत आपल्याकडे फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. त्याचप्रमाणे घरातील वस्तूंची मांडणी करताना, त्याबाबतीत देखील वास्तू शास्त्राचा आधार घेतला, तर त्या घरामध्ये सुख, समृद्धी, संपत्ती कायम टिकून राहतात. वास्तू विज्ञानाच्या नुसार काही वस्तू अश्या आहेत, ज्या घरामध्ये ठेवल्याने घरामध्ये कधीही धनाची कमतरता भासत नाही. म्हणून ह्या वस्तू तुमच्या घरामध्ये असायला हव्यात आणि त्याच बरोबर त्या वास्तू विज्ञानाने सांगितलेल्या दिशेला ठेवायला हव्यात. त्यामुळे ज्यांच्या घरामध्ये सतत आर्थिक समस्या असतील, त्यांनी हा उपाय करून पाहण्यास हरकत नाही.

वास्तू शास्त्रानुसार उत्तर दिशा ही जल, म्हणजेच पाण्याची दिशा मानली गेली आहे. घरामध्ये ह्या दिशेला पाण्याने भरलेली सुरई किंवा घट ठेवावा. जरी पाणी साठविण्यासाठी घरामध्ये अनेक तऱ्हेची भांडी असली, तरी घरामध्ये उत्तर दिशेला एक लहानसा का होईना, पण घट किंवा माठ पाण्याने भरून ठेवावा आणि त्यातील पाणी दररोज बदलत राहावे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये मनी प्लांट लावावे. हे रोप लावण्यासाठी घरातील आग्नेय दिशा किंवा दक्षिण-पूर्व दिशा शुभ मानली गेली आहे. ही दिशा गणपतीची मानली गेली असून, ह्याचा प्रतिनिधी ग्रह शुक्र आहे. गणेश विघ्नहर्ता आहेत, आणि शुक्र समृद्धीचा कारक आहे. त्यामुळे मनी प्लांट ह्या दिशेला असावे.

प्रत्येक घरामध्ये वास्तू शांतीची पूजा केली जाते. त्यावेळी वास्तू पुरुषाचे पूजन केले जाते. घरामध्ये वास्तू पुरुषाची नियमित पूजा केली जाणे शुभ मानले जाते. तसेच घरामध्ये नऊ पिरॅमिड ठेवल्याने वास्तुदोष दूर होण्यास मदत मिळते. जिथे घरातील सर्व व्यक्ती एकत्र येतात, त्या भागामध्ये हे पिरॅमिड ठेवावेत. ह्याद्वारे सर्व व्यक्तींमध्ये सकारत्मक उर्जेचा संचार होतो. त्याशिवाय घरामध्ये शांतता आणि समृद्धी नांदते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी स्वस्तिकाचे शुभचिन्ह असावे. तसेच द्वाराचे वर गणेशाची तांबड्या रंगाची प्रतिमा असावी. घरामध्ये लक्ष्मीच्या मूर्तीबरोबर कुबेराची मूर्ती आणि यंत्र असणे लाभकारी आहे.

वास्तू शास्त्रानुसार वास्तू दोष दूर करण्याकरिता पंचमुखी हनुमानांची प्रतिमा देवघरामध्ये अवश्य असावी. तसेच भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांच्या प्रतिमांच्या सोबत शंखही असावा. देवघरामध्ये लाल कपड्यामध्ये गुंडाळलेले श्रीफल, म्हणजेच नारळ असावा. ह्या सर्व वस्तू वास्तू दोष दूर करून घरामध्ये सुबत्ता, समृद्धी आणणाऱ्या आहेत.

Leave a Comment