टोक्यो ऑलिम्पिक खेळग्राम साठी नवे नियम

करोनाचे संकट अजूनही कायम असले तरी जपान मध्ये होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा वेळापत्रकाप्रमाणेच पार पडतील अशी घोषणा ऑलिम्पिक आयोजन समितीचे प्रमुख सेईको हशिमोतो यांनी शुक्रवारी केली आहे. मात्र ऑलिम्पिक खेळग्राम प्रवेशासाठी नवे नियम लागू केल्याने भारतीय दलाच्या टोक्यो ऑलिम्पिक तयारीची रूपरेषा बदलावी लागली आहे. शिवाय नव्या नियमामुळे भारताच्या ऑलिम्पिक दलाचा खर्च सुद्धा वाढणार आहे असे समजते.

नव्या नियमानुसार टोक्यो ऑलिम्पिक खेळग्राम मध्ये कुणाही खेळाडूला त्याच्या स्पर्धेच्या आधी पाच दिवस प्रवेश दिला जाणार आहे आणि स्पर्धा संपल्यावर ४८ तासात त्याला खेळग्राम सोडून बाहेर पडावे लागणार आहे. पूर्वी स्पर्धा सुरु होण्याच्या अगोदर १५ दिवस खेळाडू खेळग्राम मध्ये प्रवेश करत असत. त्यामुळे आयोजन स्थळी जाऊन सुद्धा स्पर्धेची तयारी करणे सोपे जात असे. यंदा ही सुविधा मिळणार नाही. पूर्वी स्पर्धा संपल्यावर खेळाडू, अधिकारी क्रीडा ग्राममध्ये फिरू शकत असत. यावेळी तेही शक्य होणार नाही.

भारतीय शूटर्सच्या म्हणण्यानुसार खेळग्राम मध्ये स्पर्धेआधी पाच दिवस प्रवेश म्हणजे टोक्यो रेंज मध्ये एकच सराव व लगेच थेट स्पर्धा होणार आहे. हे मोठे आव्हान आहे. नवीन नियमामुळे टोक्यो प्रवास आणि हॉटेल खर्च वाढणार आहेत. पूर्वी भारताचे ऑलिम्पिक पथक एकत्र जात असे आणि एकत्र परत येत असे. पण आता खेळग्राम मध्ये अगोदरपासून प्रवेश नसल्याने हॉटेल मध्ये राहावे लागेल आणि त्याचा खर्च वाढेल असे सांगितले जात आहे.