जमीन किती सुपीक, सांगणार अंडरवेअर

स्वित्झर्लंड मध्ये सध्या जमिनीचा कस ठरविण्यासाठी एक नवा प्रयोग केला जात आहे. आजपर्यंत मातीचा कस किंवा सुपीकपणा ठरविण्यासाठी शेतात जागेवरच किंवा प्रयोगशाळेत नेऊन मातीची तपासणी केली जात असे. पण स्वित्झर्लंडच्या अॅग्रोस्केप संस्थेने एक नवीन संशोधन हाती घेतले आहे. त्यानुसार शेतकरी आणि बागायतदारांना संस्थेतर्फे २ हजार पांढऱ्या अंडरवेअर पुरविल्या जात असून त्या जमिनीत पुरून ठेवायच्या आहेत. ठराविक काळानंतर त्या जमिनीतून बाहेर काढून त्यांची तपासणी केली जाणार आहे.

जमिनीत अंडरवेअर बरोबरच पुरण्यासाठी टी बॅग सुद्धा पुरविल्या गेल्या आहेत. त्या बाहेर काढल्यावर टी बॅग आणि अंडरवेअरवर जमिनीतील जीवजंतूचा हल्ला किती प्रमाणात आहे आणि कपडा किती प्रमाणात नष्ट झाला आहे याची तपासणी केली जाईल. कपडा जितका अधिक नष्ट झाला असेल तितकी जमीन अधिक सुपीक असे हे गणित आहे असे समजते.