गिनीज बुक मध्ये दोन वेळा नोंद केलेल्या निलांशीने या कारणाने कापले केस

गिनीज बुक मध्ये दोन वेळा जगातील सर्वाधिक लांबीचे केस असल्याचे रेकॉर्ड नोंदविलेल्या गुजराथच्या निलांशी पटेलने एका चांगल्या कारणासाठी केसांना कात्री लावली आहे. गुजराथच्या मोडासा येथे राहणाऱ्या निलांशीचे केस ६ फुट ३ इंच लांब होते. हे केस कापतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केला गेला आहे. निलांशीने १२ वर्षानंतर केस कापले असून हे केस अमेरिकेतील एका संग्रहालयाला दिले जाणार आहेत. त्याचा वापर कॅन्सरपिडीत बालकांसाठी केला जाणार आहे. कॅन्सरग्रस्तांना मदतीसाठी लोकाना प्रोत्साहन मिळावे यासाठी निलांशीने हा निर्णय घेतला असे समजते.

६ ऑगस्ट २०२० मध्ये जन्मलेल्या निलांशीचे नाव प्रथम नोव्हेंबर २०१८ मध्ये गिनीज बुक मध्ये नोंदविले गेले. त्यावेळी इटली येथील कार्यक्रमात तिच्या केसांची लांबी ५ फुट ७ इंच भरली आणि तिने अर्जेंटिनाच्या मुलीचे सर्वधिक लांबीच्या केसांचे रेकॉर्ड मोडून स्वतःचे नाव गिनीज मध्ये नोंदविले. सप्टेंबर २०१९ मध्ये तिच्या केसांची लांबी ६ फुट ३ इंच भरली आणि तिचे नाव दुसऱ्या वेळी गिनीज बुक मध्ये नोंदले गेले. निलांशी ६ वर्षाची होती तेव्हा तिने प्रथम केस कापले होते. त्यानंतर तिने आत्ता केस कापले आहेत.