वंडर नेलपॉलिश

nail-polish
हवा आणि हवेतील आर्द्रता तसेच पाणी नखांपर्यंत झिरपू देणारे वंडर नेलपॉलिश एका पोलिश कंपनीने तयार केले असून त्यामुळे मुस्लीम समाजातील महिलांना मोठेच वरदान मिळाले आहे. या पॉलिशची विक्री धडाक्याने सुरू असून सर्व रंगाच्या शेडस मोठ्या प्रमाणावर विकल्या जात आहेत. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या नेलपॉलिशच्या संशोधकाला मात्र त्याला मिळालेले यश अनुभवता आलेले नाही कारण त्याचे शनिवारी अचानकच वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले आहे.

मुस्लीम समाजातील महिलांना नेलपॉलिश वापरणे मोठे जिकीरीचे बनले होते. कारण दिवसातून पाच वेळा प्रार्थना करताना दरवेळी हात धुवावे लागतात आणि त्यात हाताला तसेच बोटे, नखे सर्वांना पाण्याचा स्पर्श होणे मुस्लीम कायद्यानुसार बंधनकारक असते. बाजारात उपलब्ध असलेली नेलपॉलिश वापरली तर नखांना पाण्याचा स्पर्श होत नाही त्यामुळे ती वापरता येत नाहीत आणि वापरायची असली तर रात्री सर्व प्रार्थना संपल्यानंतर लावायची व सकाळची पहिली प्रार्थना करण्यापूर्वी ते काढून टाकायचे असा व्याप करावा लागत असे. परिणामी अनेक महिला नेलपॉलिश वापरतच नसत. मात्र या नव्या नेलपॉलिशमुळे त्यांची ही समस्या सुटली असून एका इस्लामिक विद्वानाने त्याच्या चाचण्या करून त्यातून पाणी नखांपर्यंत पोहोचते याची खात्री करून घेतली आहे.

पोलंडमधील इनग्लॉट कंपनीने हे नेलपॉलिश बाजारात आणले आहे. पोलिश केमिस्ट वोझिक इनग्लॉट याने ते तयार केले. विशेष म्हणजे वोझिकने कंपनी स्थापन केल्यापासून अनेक बिझिनेस पारितोषिके मिळविली आहेत. १९८३ साली त्याने ही कंपनी सुरू केली तेव्हा पोलंड कम्युनिस्ट रूलखाली होता. मात्र तरीही वोझिकने आपल्या व्यवसायाच्या विस्तार अतिशय समर्थपणे केला. आज त्याच्या कंपनीची ५० हून अधिक देशात दुकाने असून त्यात मास्को, न्यूयॉर्क, इस्तंबूल, दुबई यांचा समावेश आहे. सतत चार वर्षांच्या परिश्रमातून वोझिकने हे नेलपॉलिश तयार केले आहे.

कॉन्टॅक्ट लेन्समध्ये वापरण्यात येणाऱ्या पॉलिमरचाच वापर त्याने यासाठी तंत्रज्ञान विकसित करताना केला आहे. ही प्रक्रिया खर्चिक आहे व त्यामुळे या उत्पादनातून मिळणाऱ्या फायद्याचे प्रमाणही कमी आहे असे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment