नाशिक सिक्युरिटी प्रेस मध्ये चलनी नोटा छपाई बंद

करोना प्रकोपामुळे वाढत चाललेला धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रातील नाशिक येथे होणारी चलनी नोटांची छपाई ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. नाशिकच्या करन्सी सिक्युरिटी प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये चलनी नोटा छापल्या जातात. या दोन्ही ठिकाणी ३० एप्रिल पर्यंत नोटा छपाईचे काम थांबविले गेले आहे. येथे सध्या फक्त फायर ब्रिगेड, पाणीपुरवठा, वैद्यकीय सुविधा या आवश्यक सेवांतील कर्मचारी कामावर येणार आहेत. नोटा छपाई कर्मचारी कामावर येणार नाहीत.

भारतात चलनातील एकूण ४० टक्के नोटा या प्रेस मध्ये छापल्या जातात. दोन्ही कंपन्यात मिळून ३ हजार कर्मचारी आहेत. त्यांची आरोग्य सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला गेला आहे. गेल्या वर्षी सुद्धा करोना काळात या प्रेस मधील नोटा छपाई काही दिवस बंद ठेवली गेली होती कारण येथील ४० कर्मचारी करोना संक्रमित आढळले होते. गेल्या वेळी जेव्हा नोट छपाई बंद होती तेव्हा सरकारने नागरिकांना डिजिटल देवघेव वापरण्याचे आवाहन केले होते. नोटा हाताळण्यातून सुद्धा करोना प्रसार होऊ शकतो म्हणून ही खबरदारी घेतली गेली होती.