करोना काळातही चीनी अर्थव्यवस्था सुसाट

करोना मुळे पूर्ण जगातील देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या असल्याचे चित्र असताना चीन ने नव्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत गतवर्षी प्रेक्षा १८.३ टक्के वाढ नोंदविली आहे. चीनच्या सांखिकी विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार अनेक क्षेत्रात चीन मजबूत बनले आहे. २०२० च्या पहिल्या तिमाहीत करोना मुळे देशव्यापी लॉक डाऊन होता त्यामुळे अर्थव्यवस्थेची गती ६.८ टक्क्यांवर थांबली होती.

मात्र जीडीपीने १९९२ नंतर प्रथमच सर्वात मोठी उसळी घेतली असून १ वर्षात औद्योगिक उत्पादन १४.१ टक्क्यांनी वाढले आहे तर विक्रीत ३४.२ टक्के वाढ दिसून आली आहे. चीन सरकारने करोना प्रसार रोखण्यासाठी योजलेले कडक उपाय आणि त्याचवेळी व्यापारासाठी दिलेली आपत्कालीन सुरक्षा आणि आधार याचा फायदा अर्थव्यवस्था वेगाने सुधारण्यात झाल्याचे सांगितले जात आहे. काही तज्ञांच्या मते गत वर्षीचे आकडेच इतके कमजोर आहेत की त्यामुळे यावेळची सांखिकी आकडेवारी मजबूत वाटते आहे. त्यामुळे प्रत्यक्षात अर्थव्यवस्थेची परिस्थिती सांगितली जातेय तितकी मजबूत आहे असे म्हणता येणार नाही.