इजिप्त मध्ये वाळूत दबलेली ३४०० वर्षापूर्वीची गोल्ड सिटी सापडली

इजिप्त मध्ये पुरातत्व विभागाला दक्षिण भागात लग्झर मध्ये नाईल नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर गोल्ड सिटीचा शोध लागला आहे. १९२२ मध्ये इजिप्तचा सर्वाधिक चर्चित फेरो राजा तुतानखामेन याच्या कबरीच्या शोधानंतरचे हे सर्वात मोठे यश मानले जात आहे. फेसबुकवर पुरातत्व खात्याचे माजी राज्यमंत्री आणि पुरातत्व तज्ञ जाही हवास यांनी ही घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे या गोल्ड सिटीचा शोध अपघाताने लागला आहे. ३४०० वर्षे जुन्या किंग व्हॅलीजवळच राजा तुतानखामेनच्या कबरीचा शोध लागला होता. येथेच १० किलो वजनाचा सोन्याचा मुखवटा आणि पाच हजार मौल्यवान कलाकृती त्यावेळी सापडल्या होत्या. तुतानखामेनच्या शवमंदिराचा शोध घेताना अचानक ही गोल्ड सिटी सापडल्याचे समजते. या शहराचे नाव ‘एटन’ असे होते. १८ व्या वंशातील ९ वा फेरो राजा अमेनोटेप ३ याने हे शहर वसविले होते असे सांगतात.

येथील उत्खननात एका माणसाची कबर सापडली असून त्याच्या हातात शस्त्र पण पाय दोरीने बांधलेले आहेत. सोन्याच्या वर्खातील मासा, मातीचे मोठे रांजण, काच, धातूचे कारखाने, दारूच्या सुरया, मातीची भांडी, गाईचा सुंदर मुखवटा, अश्या अनेक वस्तू येथे आढळल्या आहेत. रंगीत दगडाच्या अनेक कलाकृती सुद्धा सापडल्या आहेत. शहराची रचना अतिशय नेटकी असून रस्त्याच्या दोन्ही कडेला घरे, घराबाहेर नागासारखी वळणदार १० फुट उंचीची भिंत जशीच्या तशी सापडली आहे. हे शहर वसविले गेले तो इजिप्तचा सुवर्णकाळ होता असे सांगतात. या शहराच्या दुसऱ्या भागाचे उत्खनन अजून केले गेलेले नाही. ते काम पूर्ण होण्यास पाच वर्षे लागतील असे समजते.