देशात कोरोनाबाधितांच्या वाढीची लाट; आढळले २,१७,३५३ कोरोना पॉझिटिव्ह


नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले असून कोरोनाने महाराष्ट्र, छत्तीसगढ, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली पाठोपाठ देशातील इतर राज्यांतही हातपाय पसरले असून, झोप उडवणारी आकडेवारी दररोज समोर येऊ लागली आहे. देशात पहिल्या लाटेतील उच्चांकांच्या दुप्पट रुग्णसंख्या दुसऱ्या लाटेत नोंदवली गेली आहे. आज पुन्हा एकदा विक्रमी कोरोनाबाधितांची वाढ नोंदवली गेली असून, हजारांच्या पुढे मृत्यूचा आकडाही आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात १ हजारांपेक्षा जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे.

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून, देशात गेल्या २४ तासांत दोन लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. देशातील गेल्या २४ तासांतील कोरोना परिस्थितीची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. यात रुग्णासंख्या वाढीबरोबरच मृत्यूंची संख्या वाढत असल्याचेही समोर आले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशात तब्बल २ लाख १७ हजार ३५३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १ लाख १८ हजार ३०२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. यात चिंतेची बाब अशी की देशातील मृतांचा आकडा सलग तिसऱ्या दिवशी एक हजारांच्या पुढे गेला आहे. देशात २४ तासांत १ हजार १८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ७४ हजार ३०८ झाली आहे.