सरसंघचालक मोहन भागवत झाले कोरोनामुक्त; पाच दिवस विलगीकरणात राहणार


नागपूर – कोरोनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यशस्वीरित्या मात केली आहे. मोहन भागवत यांचा कोरोना रिपोर्ट ९ एप्रिलला पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना किग्जवे या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान मोहन भागवत यांना पुढील पाच दिवस विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

सर्दी व खोकल्याचा त्रास मोहन भागवत यांना जाणवू लागल्याने शुक्रवारी त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. यावेळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना रात्रीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचारानंतर सर्व चाचणींचे अहवाल समाधानकारक असल्याने मोहन भागवत यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. पुढील पाच दिवस त्यांना गृह विलगीकरणात राहावे लागणार आहे.