कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हज यात्रेला जाण्याची केवळ ‘या’ लोकांनाच परवानगी


नवी दिल्ली – हज यात्रेवरही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हज यात्रेसंदर्भात यावर्षी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत भारतातील हज समिती एसएसआयने म्हटले आहे की, कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस ज्या लोकांनी घेतले आहेत, त्यांनाच हज यात्रेला जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्यावर्षी साऊदी सरकारने कोरोनामुळे विदेशातील लोकांना हज यात्रेला येण्यास बंदी घातली होती.

गुरुवारी रात्री उशिरा ही घोषणा सौदीचे आरोग्य मंत्रालय आणि जेद्दह येथील भारतीय वाणिज्य दूतावास यांच्या ताज्या सूचनांनंतर एचसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकसूद अहमद खान यांनी केली आहे. दरम्यान, हज यात्रेला जाणाऱ्या भारतातील मुस्लिम समुदायासाठी जून महिन्यात उड्डाणे सुरु होणार आहेत. याशिवाय, हज यात्रेच्या दर्जाबाबत सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा केली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सुचनाचे हज यात्रेदरम्यान पालन करणे सक्तीचे आहे. हज यात्रेकरूंचा येत्या 26 जूनपासून सौदी अरेबियाला जाण्याचा प्रवास सुरु होणार आहे. तर, सौदीला जाण्यासाठी 13 जुलै ही अंतिम तारीख असणार आहे. तसेच त्याचबरोबर, 14 ऑगस्टपासून परतीचा प्रवास सुरु होणार होईल. कोरोनामुळे हज 2020 वर जाऊ न शकलेल्या 1 लाख 23 हजार लोकांचे 2100 कोटी रुपये कोणत्याही कपातीशिवाय परत करण्यात आले होते. त्याचवेळी, सौदी अरेबियाच्या सरकारने 2018-19 साठी हज यात्रेकरूंच्या वाहतुकीसाठी सुमारे 100 कोटी रुपये परत केले होते. दरवर्षी हजसाठी सरासरी सुमारे 2 लाख लोक सौदी अरेबियात जातात.