कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण


बंगळुरु – देशात पुन्हा एकदा कोरोनामुळे स्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव एवढ्या झपाट्याने होत आहे की रुग्णालयात उपलब्ध असलेली बेडसंख्याही कमी पडत आहे. नेतेमंडळीही कोरोनाच्या तडाख्यातून सुटलेली नाही. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी हलका ताप आल्यामुळे कोरोना चाचणी केली होती. त्यांना त्यात कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मला हलका ताप होता. त्यामुळे मी चाचणी करण्याचा निर्णय घेतला त्यात मला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. माझी तब्येत ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माझी विनंती आहे की, जे कुणी मागच्या दिवसात माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी काळजी घ्यावी आणि वैयक्तिक क्वारंटाइन व्हावे, अशी विनंती करणारे ट्वीट येडियुरप्पा यांनी केले आहे. मागील दोन दिवसांपासून येडियुरप्पा यांना ताप येत आहे. त्यामुळे त्यांना बंगळुरुच्या रमैया मेमोरिअल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गेल्या वर्षीही ७८ वर्षीय बीएस येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना ऑगस्ट महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. योग्य उपचाराअंती दोघांनी कोरोनावर मात केली आणि त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते.