जो बायडेन यांना हात जोडून अदर पुनावालांची विनंती


नवी दिल्ली – भारतात कोरोना लसीकरण मोहिम सुरु असतानाचा देशभरातील अनेक राज्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींची तुटवडा निर्माण झाल्याची तक्रार आरोग्य यंत्रणा व राज्य सरकार करत आहे. त्यातच अनेक राज्ये व केंद्र सरकार लसीकरणावरुन आमने-सामने आले असून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी लसींच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती दिली होती. हा पुरवठा अमेरिका आणि युरोपने थांबवला असल्याचे त्यांनी सांगितले होते. कच्च्या मालाचा पुरवठा अद्यापही होत नसल्यामुळे आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाच हात जोडून अदर पुनावाला यांनी विनंती केली आहे.

कोरोना लसीसाठी लागणारा कच्चा माल अमेरिका आणि युरोपमधून येतो. पण त्याचा पुरवठा त्यांनी थांबवल्यामुळे सीरम इन्स्टिट्युटला कच्चा माल मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे अदर पुनावाला यांनी सांगितले होते. दरम्यान त्यांनी आता थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ट्विटमध्ये टॅग करत विनंती केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये पुनावाला म्हणाले की, आदरणीय जो बायडेन… आपण जर खरच कोरोना व्हायरसविरोधातील लढाईत एकत्र आहोत, तर मग मी आपणांस अमेरिकेबाहेरील लस उद्योगाच्या वतीने नम्रपणे विनंती करतो की, अमेरिकेबाहेर होणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी उठवा. यामुळे लसीच्या निर्मितीला वेग मिळेल. तुमच्या प्रशासनाकडे याची सविस्तर माहिती आहे.

या आधीही कच्च्या मालाचा मुद्दा अदर पुनावाला यांनी उपस्थित केला होता. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले होते. त्यांनी त्यावेळी शक्य असते तर मीच अमेरिकेत जाऊन आंदोलन केले असते, असे म्हटलं होते. मला शक्य असते तर मी स्वतः अमेरिकेत गेलो असतो आणि स्वत: अमेरिकेच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले असते. त्यांना सांगितले असते की तुम्ही फार महत्त्वाचा असा कच्चा माल रोखून धरला आहे. भारतातीलच नव्हे, तर जगभरातील कोरोना लस निर्मिती करणाऱ्या उत्पादकांसाठी हा कच्चा माल आवश्यक असल्याचे अदर पूनावाला यांनी सांगितले होते.

लसीसाठी महत्त्वाचा असलेला कच्चा माल आम्हाला आत्ता हवा आहे. आम्हाला त्याची सहा महिने किंवा वर्षभरानंतर आवश्यकता नसेल. कारण तोपर्यंत आम्ही दुसऱ्या पुरवठादाराकडून तो माल मिळवण्याची व्यवस्था केली असेल. पण आत्ता या घडीला आम्हाला अमेरिका आणि युरोपकडून येणाऱ्या कच्च्या मालाची आवश्यकता असल्याचे पूनावाला यांनी स्पष्ट केले होते.