कोरोनाची लागण झाल्यानंतर रक्तात गाठी होण्याचा धोका अधिक


नवी दिल्ली – कोरोनाची लागण झाल्यानंतर ‘सेरेब्रल व्हेनस थ्राँबॉयसिस’ (सीव्हीटी) नावाने ओळखल्या जाणाऱ्या रक्ताच्या गाठी होण्याचा धोका लसीकरणानंतरच्या धोक्यापेक्षा बराच मोठा असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. गुरुवारी हे निष्कर्ष जाहीर करण्यात आले.

ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अभ्यासात, कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर किंवा प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा दिल्यानंतरच्या दोन आठवड्यांत निदान झालेल्या सीव्हीटीच्या प्रकरणांची संख्या मोजण्यात आली. त्यांनी याची तुलना शीतज्वरानंतरच्या (इन्फ्ल्युएंझा) गणना झालेल्या सीव्हीटीच्या घटनांशी केली. इतर कुठल्याही तुलनात्मक गटापेक्षा कोरोनानंतर सीव्हीटीचे प्रमाण अधिक दिसून येत असल्याचे या टीमला आढळले. यापैकी ३० टक्के प्रकरणे ३० वर्षांहून कमी वयोगटात आढळल्याचा त्यांचा निष्कर्ष होता.

कोरोनाच्या सध्याच्या प्रतिबंधक लसींच्या तुलनेत, हा धोका ८ ते १० पट अधिक असून, आधारभूत रेषेच्या तुलनेत तो अंदाजे १०० पट अधिक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. लसी आणि सीव्हीटी यांच्यातील संभाव्य संबंधाबाबत काही काळजीच्या बाबी असल्याने, काही लसींच्या वापरावर निर्बंध आणणे भाग पडत आहे, असे ऑक्सफर्ड विद्यापीठातील ट्रान्सलेशनल न्यूरोबायोलॉजी गटाचे प्रमुख पॉल हॅरिसन यांनी सांगितले.