हाफकिन निर्मित कोरोना लस एप्रिल 2022 मध्ये येणार बाजारात


मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ठरल्याप्रमाणे सर्वकाही सुरळीत झाले तर आगामी वर्षाच्या एप्रिलमध्ये हाफकिन इन्स्टिटयूटमध्ये उत्पादित केलेली कोरोना लस प्राप्त होऊ शकते. 22.8 कोटी एवढ्या डोसेजची निर्मिती एका वर्षभरात करण्याची क्षमता या इन्टीट्यूटची असल्यामुळे आगामी काळात देशासाठी मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होणार आहे.

बायोसेफ्टी लेवल -3 लॅब या लसीकरिता उभारावी लागणार आहे. त्याचबरोबर या प्रोजेक्ट्ला आता मंजुरी मिळाली असून येत्या काळात गरज पडल्यास कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेता त्याप्रमाणे माणसे घेतली जातील, असे हाफकिन बायो फार्मसीयूटिकल्सचे व्यस्थापकीय संचालक डॉ. संदीप राठोड यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

दोन महिन्यापूर्वीच हाफकिनमध्ये लस निर्मितीला परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहून हाफकिन इन्स्टिट्यूट आणि हिंदुस्तान अँटिबायोटिकलला लस उत्पादन करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली. अखेर केंद्र सरकारकडून ही परवानगी मिळाली आहे.