राम मंदिराच्या उभारणीसाठी गोळा करण्यात आलेल्या देणग्यांपैकी १५ हजार चेक झाले बाऊन्स !


अयोध्या – अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरात देणगी मोहीम राबवण्यात आली होती. राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून लाखो लोकांनी देणग्या दिल्या. काहींनी रोख रकमेच्या स्वरूपात, तर काहींनी ऑनलाईन ट्रान्स्फरच्या रुपात तर काहींनी चेकच्या स्वरूपात या देणग्या दिल्या होत्या. पण देणग्यांच्या या चेकपैकी विश्व हिंदु परिषदेने गोळा केलेले तब्बल १५ हजार चेक बाऊन्स झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

ही बाब राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या ऑडिट रिपोर्टमधून समोर आली असून ट्रस्टकडून संबंधित देणगीदारांना पुन्हा देणगी देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, यातील अनेक चेक हे संबंधित खात्यांमध्ये पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे बाऊन्स झाले आहेत तर अनेक चेक हे तांत्रिक समस्येमुळे बाद ठरवण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी वादावर निर्णय दिला आणि हा वाद मिटला. राम मंदिराची उभारणी वादग्रस्त जागेवर करण्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. तसेच, मशिदीसाठी देखील अयोध्येमध्येच मोक्याच्या ठिकाणी ५ एकर जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रशासनाला निर्देश देण्यात आले.

राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची देखील राम मंदिराच्या उभारणीसाठी स्थापना करण्यात आली. याच ट्रस्टच्या माध्यमातून देशभरात प्रस्तावित राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहीम राबवण्यात आली. पण त्यातील २२ कोटी रुपयांचे एकूण १५ हजार चेक बाऊन्स झाले आहेत. विशेष म्हणजे यातील २ हजार चेक खुद्द अयोध्येमधीलच देणगीदारांनी दिल्याची देखील माहिती समोर आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाला ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेक मंजूर करण्यात आलेल्या तांत्रिक समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात संबंधित बँकाना विनंती करण्यात आली आहे. तसेच, पुन्हा देणगी देण्याची विनंती देखील संबंधित देणगीदारांना करण्यात आली आहे. बाऊन्स झालेल्या चेकपैकी २ हजार चेक अयोध्येमधूनच गोळा करण्यात आले होते.