वाहतूक नियम मोडले १९९ वेळा, दंड नाही भरला, आता लोम्बर्गिनी विसरा

वाहतूक नियम मोडला तर दंड होणारच. अर्थात प्रत्येक देशातील त्या संदर्भातले नियम वेगळे असू शकतात. पण वारंवार वाहतूक नियम मोडायचा आणि दंड भरायचाच नाही अशी वृत्ती असेल तर काय होते याचे उदाहरण रशियात समोर आले आहे. रशियातील एक प्रसिद्ध ब्लॉगर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. नास्या इव्लिवा (Nastya Ivleeva) असे या मुलीचे नाव आहे. विशेष म्हणजे तिला सोशल मिडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग असून इन्स्टावरील तिच्या प्रत्येक पोस्ट ला करोडो लाईक मिळतात. तिचे इन्स्टावर १० कोटी ८० लाख फॉलोअर आहेत.

या वेळी नास्या चर्चेत आहे ती तिच्या महागड्या म्हणजे १ कोटी ९४ लाख रुपये किमतीच्या लोम्बर्गिनी कारवरून. तिची ही कार पोलिसांनी उचलून नेली आहे. कारण नास्याने तब्बल १९९ वेळा वाहतूक नियम मोडून एकदाही दंड भरलेला नाही. अर्थात वारंवार वाहतूक नियम तोडणे ही तिची खोड आहे असेही समजते. एक वर्षात १९९ वेळा वाहतूक नियम मोडून जणू तिने विक्रम केला आहे. अखेरी पोलिसांनी तिची लोम्बर्गिनी उचलून नेली आहे आणि दंडाची सर्व रक्कम भरल्यावर तिला ती परत दिली जाईल.

नास्या मास्कोची रहिवासी आहे. ती सांगते, ‘माझ्या या कारपासून मी दूर राहू शकत नाही. दंड भरून मी ती परत आणणार. त्यासाठी जे करायला लागेल ते सगळे करणार.’ विशेष म्हणजे वाहतूक नियम मोडणे हे तिच्या अंगवळणी पडले आहे. यापूर्वीही अनेकदा तिला या संदर्भात दंड झाला आहे. अतिवेगाने कार चालविणे, नो पार्किंग मध्ये कार उभी करणे, चुकीची वळणे घेणे, लाईन क्रॉस करणे असे गुन्हे ती नेहमीच करते असे समजते.