लवकरच येतील करोना पासपोर्ट 

समजा तुम्हाला परदेशात जाऊन क्रिकेट सामना पहायचा आहे. किंवा फुटबॉल सामना पहायचा आहे, किंवा नुसत्याच काही खास देशांना भेटी द्यायच्या आहेत तर करोना असला तरी आगामी काळात करोना पासपोर्टच्या मदतीने तुम्ही तुमच्या या इच्छा पूर्ण करू शकाल असे संकेत मिळत आहेत. जगभरातील अनेक देश करोना पासपोर्ट लागू करावा यासाठी प्रयत्नशील असून त्याची सुरवात अमेरिकेपासून होईल असे संकेत मिळत आहेत.

हा पासपोर्ट म्हणजे दुसरे काही नसून कोविड १९ लसीकरण प्रमाणपत्र किंवा कोविड १९ रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र स्वरुपात असेल. अमेरिकेतील अनेक मंत्री यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार यामुळे शाळांपासून व्यापारी व उद्योग संस्था पूर्ण क्षमतेने सुरु होतील. शॉपिंग मॉल मध्ये  ग्राहक परततील आणि शाळेत विद्यार्थी येतील. शिवाय यामुळे करोना प्रसारावर आपोआप नियंत्रण येईल.

करोना उद्रेकामुळे अनेक देशांनी अन्य देशातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. करोना पासपोर्ट आले की बंदी घालण्याची गरज संपेल. लसीचे प्रमाणपत्र हा काही नवा प्रकार नाही. पिवळा ताप, पोलिओ साठी अशी प्रमाणपत्रे अनेक देशात दाखवावी लागतात. मात्र अमेरिकेच्या ज्या राज्यात रिपब्लिकन गव्हर्नर आहेत त्यांनी मात्र करोना पासपोर्टला विरोध केला आहे. त्याच्या मते असे प्रमाणपत्र मागणे लोकांच्या खासगीपणावर अतिक्रमण आहे त्यामुळे हा अपराध या कॅटेगरीत येईल.