ब्रिटनवर राज्य राणीचे पण सर्वाधिक जमिनीचा मालक वेगळाच

ब्रिटनवर ब्रिटीश राजघराण्याची सत्ता आणि शासन आहे मात्र ब्रिटन मधील सर्वाधिक जमिनीचा मालक म्हणजे जमीनदार मात्र वेगळाच आहे याची अनेकांना कल्पना नसेल. द गार्डियनच्या बातमीनुसार ब्रिटन मधील ४० हजार हेक्टर जमीन, दुबईला जगातील सुंदर शहर बनविणाऱ्या युएईचे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मख्तुम यांच्या मालकीची आहे. ४० हजार हेक्टर म्हणजे साधारण १ लाख एकर. त्यामुळे हे शेख ब्रिटन मधील सर्वात मोठे जमीनदार आहेत.

लंडनच्या पॉश आणि महागड्या भागात या शेखच्या मालकीच्या अनेक भव्य हवेल्या, महाल, न्यू मार्केटसारख्या भागात ट्रेनिंग सेंटर आहेत. स्कॉटिश हायलंड मध्ये २५ हजार हेक्टर जमीन आहे. विशेष म्हणजे ब्रिटनच्या शाही परिवाराने सुद्धा या शेखला जमिनी विकल्या आहेत. ब्रिटनच्या हायप्रोफाईल लोकांमध्ये या शेखचा दबदबा आहे. त्याने हॉर्स रेसिंग मध्ये २०११ ते २०२० या काळात एकट्याने ६ हजार कोटींची गुंतवणूक केल्याचेही सांगितले जाते. शेख व त्याच्या परीवाराजवळ न्यू मार्केट परिसरात १०० पेक्षा जास्त प्रॉपर्टीज आहेत.

यामुळेच २०१९ मध्ये जॉकी क्लबने राणी एलिझाबेथ द्वितीय बरोबरच शेखचा सन्मान करून त्याचेही पोर्ट्रेट लावले आहे. शेख मोहम्मद बिन रशीद अल मख्तुम यांच्या वकिलाने ही सर्व गुंतवणूक कायदेशीर मार्गाने केली गेल्याचा दावा केला आहे. त्यात करचोरीचा कुठलाही प्रकार नाही असे त्याचे म्हणणे आहे.