१५ हजार फुट उंची, पायी प्रवास करून सैनिकांचे लसीकरण

करोना लसीकरण करताना आरोग्य कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालूनही आपले काम कसे चोख बजावत आहेत याचे एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. चीन सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना लसीकरणासाठी आरोग्य केंद्रावर घेऊन येणे शक्य नाही असे लक्षात आल्यावर मुख्य अधिकारी  डॉ. हरीश पंत यांनी आरोग्य टीमलाच तिकडे पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे आरोग्य कर्मचारी अतिशय दुर्गम भागातील खडतर प्रवास करून सैनिकांचे लसीकरण करून परतले आहेत.

यासाठी त्यांना तीन दिवस प्रवास करावा लागला. १५ हजार फुटावरील नाबीधांग आणि १० हजार फुटांवरील गुंजी येथील आयटीबीपी आणि एसएसबी विभागातील १६६ सैनिकांना करोना लसीचा दुसरा डोस दिला गेला. यासाठी या आरोग्य कर्मचाऱ्यांना १५ किमीचा खडतर रस्ता पायी पार करावा लागला. अर्थात यापूर्वीही सीमा भागातील चौक्यांवर जाऊन तेथील सैनिकांचे लसीकरण करण्याचे काम आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले आहे.