बॉलीवूड कलाकारांचे पाकिस्तानी हुबहू

असे म्हणतात की जगात एकसारखी दिसणारी सात माणसे असतात. अर्थात सर्वसामान्य माणूस त्याच्या सारखी दिसणारी माणसे जगात कुठे कुठे आहेत हे शोधून काढू शकणार नाही हेही खरे. पण बॉलीवूडची बात वेगळी. येथील तारे तारकांना त्यांच्या सारखे दिसणारे अन्यत्र कुठे आहेत हे स्वतः शोधायची गरजच नसते. त्यांच्यासाठी हे काम त्याचे चाहते करत असतात. त्यात आता सोशल मिडियामुळे हे काम खूप सोपे झाले आहे. आपला शेजारी पाकिस्तान मध्ये बॉलीवूड तारे तारकांशी साम्य असलेले कोण कोण आहेत हे माहिती करून घेणे रोमांचक आहे.

बॉलीवूड क्वीन, सौंदर्याची राणी ऐश्वर्या राय सारखी दिसणारी पाकिस्तानी अमाना इम्रान ब्युटी ब्लॉगर आहे. प्रथम नजरेत एकदम ही ऐश्वर्या नाही हे सांगणे अवघड आहे. तिचे इन्स्टावर २६ हजार फोलोअर आहेत.

लोलो उर्फ करिष्मा कपूरची कॉपी असलेली हीना नुकतीच या साम्यामुळे चर्चेत आली आहे. हीना टिक टॉक गर्ल म्हणून प्रसिद्ध असून ती करीश्माची गाणी आणि डायलॉगवर लिप सिंक करते. तिचेही इन्स्टा वर ३१ हजार फॉलोअर होते ती संख्या आता ४१ हजारावर गेली आहे.

दबंग खान म्हणजे सलमान खान यांचा हुबहू असलेला हसमन सलीम सियालकोटचा रहिवासी आहे. त्याचे युट्युब वर अनेक व्हिडीओ आहेत. त्याचे चालणे आणि स्टाईल अगदी सलमान सारखी आहे.

रणवीरसिंग सारखा दिसणारा हमद शोएबची प्रत्येक गोष्ट रणवीरला मॅच होईल अशीच असते. त्याचे चालणे, दाढी, डोळे रणवीरची आठवण करून देतात. पाकिस्तान मध्ये तो रणवीर म्हणूनच प्रसिद्ध आहे.