आयसीसीनंतर विस्डनकडूनही विराट कोहलीचा सन्मान


नवी दिल्ली – गुरुवारी आणखी एक मानाचा तुरा सातत्यपूर्ण कामगिरी करत वाहवा मिळवणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात खोवला गेला आहे. विस्डन अलमॅनाककडून गेल्या दशकातील (2010 ते 2020) सर्वोत्तम एक दिवसीय खेळाडू म्हणून विराट कोहली याची निवड करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने यापूर्वी दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या पुरस्कारांची घोषणा केली होती. यातही विराट कोहलीला दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर झाला होता.

2008 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने पदार्पण केले होते. तो श्रीलंकेविरुद्ध आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर गेल्या दशकभरात तो टीम इंडियाचा ‘रनमशीन’ म्हणून उदयाला आला. टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 चा विश्वचषक जिंकला, विराट त्या संघाचा सदस्य होता. गेल्या दशकभरात त्याने 11 हजारांहून अधिक धावा आणि 42 शतक ठोकले आहेत. तसेच एकूण कारकीर्दीमध्ये त्याच्या नावावर 254 लढतीत 12,169 धावांची नोंद असून यात 43 शतकांचा आणि 62 अर्धशतकांचा समावेश आहे.

दरम्यान, सलग दुसऱ्या वर्षी ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू’ म्हणून इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याची निवड करण्यात आली. गेल्या वर्षी स्टोक्सने 641 धावा आणि 19 बळी घेतले. स्टोक्ससह वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू किरोन पोलार्ड याला सर्वोत्तम टी-20 खेळाडू तर ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीला सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले.

विराट कोहली याच्यासह सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यांचाही सन्मान करण्यात आला आहे. नव्वदच्या दशकातील सचिनची, तर ऐंशीच्या दशकातील कपिल देव यांची सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड झाली. सचिन नव्वदच्या दशकात सर्वोत्तम फॉर्मात होता. त्याने 1998 साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9 शतकांचा विक्रम केला होता. तर ऐंशीच्या दशकात कपिल देव यांनी टीम इंडियाला विश्वचषक जिंकून दिला होता. तसेच सर्वाधिक बळी घेत सर्वोत्तम स्ट्राईक रेटने एक हजार धावा चोपण्याचाही विक्रम केला होता.