राजधानी दिल्लीत शुक्रवारी रात्री ते सोमवारी सकाळपर्यंत विकेंड कर्फ्यू


नवी दिल्ली – सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या दरम्यान परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी रात्री 10 ते सोमवारी सकाळी 6 या वेळेत दिल्लीत शनिवार व रविवार विकेंड कर्फ्यूची घोषणा केली आहे. केजरीवाल यांनी शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपराज्यपाल अनिल बैजल यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत विकेंड कर्फ्यूची घोषणा केली आहे. विकेंड कर्फ्यू दरम्यान, मॉल, स्पा, जिम, सभागृह इत्यादी ठिकाण बंद राहतील, परंतु थिएटर 30 टक्के क्षमतेसह सुरू असतील.

केजरीवाल यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, साप्ताहिक बाजाराला झोननिहाय परवानगी दिली जाईल. साप्ताहिक बाजारपेठेतील गर्दी कमी व्हावी यासाठी विशेष व्यवस्था केली जात आहे. रेस्टॉरंटमध्ये यापुढे बसण्याची आणि खाण्याची परवानगी दिली जाणार नाही, फक्त होम डिलिव्हरीला परवानगी असेल. केवळ अत्यावश्यक सेवा आणि विवाहसोहळ्यांशी संबंधित लोकांना कर्फ्यू पास देण्यात येईल.

दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता नसून सध्या 5,000 हून अधिक बेड रिकामे आहेत. दिल्लीतील सर्व रुग्णांना उपचार आणि बेड मिळू शकतील, असा आमचा प्रयत्न आहे. दरम्यान बुधवारी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले होते की, राजधानीत कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये दररोज झपाट्याने वाढ होत आहे. राजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरातील विविध रूग्णालयात बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. याशिवाय दिल्ली सरकारने पुन्हा केंद्राला रुग्णालयांमध्ये बेडची संख्या वाढविण्यासंदर्भात विनंती केली असल्याचेही जैन यांनी सांगितले.