कुंभमेळ्यात सामील झालेल्या निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनामुळे निधन


हरिद्वार – मध्यप्रदेशहून हरिद्वारयेथील कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महामंडलेश्वर कपिल देव हे कोरोनाबाधित असल्याचे निष्पण झाल्यानंतर त्यांना देहरादून येथील कैलाश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे त्या ठिकाणीच उपचारादरम्यान निधन झाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हरिद्वारमध्ये कुंभमेळ्यात लागू करण्यात आलेल्या नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाले. मागील ७२ तासांमध्ये दीड हजारांहून अधिक कोरोनाबाधित हरिद्वार कुंभमेळा परिसरातून समोर आल्या आहेत. शिवाय अनेकांचा मृत्यू देखील झालेला आहे. कोरोनाबाधितांची संख्या आता आणखी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.

बुधवारी हजारो साधूंनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा दिलेला इशारा धुडकावून हरिद्वारमधील हर की पैरी येथे गंगा नदीत कुंभमेळ्यातील तिसरे शाहीस्नान केले. सामाजिक अंतराच्या नियमांची पायमल्ली करून दुसऱ्या शाहीस्नानालाही साधूंसह अन्य भाविकांनी गर्दी केली होती.