कोरोनाचा कहर कायम; काल दिवभरात 2 लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद


नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर अजूनच वाढत असून जगभरात सर्वाधिक कोरोनाबाधित भारतात आढळून येत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा आता दोन लाखांच्या पार पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 2,00,739 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे 1038 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तत्पूर्वी मंगळवारी 184372 नवीन कोरोनाबाधित आढळून आले होते. गेल्या वर्षी 2 ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होते असून कोरोनाबाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून राज्यात 144 कलम लागू करण्यात आले असून राज्यात पुढील 15 दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याला ‘ब्रेक द चेन’ असे नाव देण्यात आले आहे. ब्रेक द चेन या निर्बंधाचा आज पहिला दिवस आहे. पुढील 15 दिवस म्हणजे 1 मे पर्यंत राज्यात कलम 144 लागू असणार आहे. त्यामुळे विनाकारण कुणालाही बाहेर फिरता येणार नाही.

राज्यातील कोरोनाबाधितांचे आकडे कमी होताना दिसत नाही. मागील 24 तासात राज्यभरात 58 हजार 952 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली. तर 39 हजार 624 कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण 29 लाख 05 हजार 721 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. राज्यात सद्यस्थिताला एकूण 6 लाख 12 हजार 070 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.21 टक्के झाले आहे. राज्यात काल 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 1.64 टक्के आहे.