भाजप नेते आशिष शेलार आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंना कोरोनाची लागण


मुंबई – राज्यावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला असून कोरोनाची अनेक राजकीय नेत्यांनाही लागण होत आहे. दुसऱ्यांदा कोरोनाची लागण शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना झाल्याचे समोर आलेले असतानाच आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.


आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले अशी माहिती आशिष शेलार यांनी बुधवारी रात्री उशीरा ट्विटरद्वारे दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी औषधोपचार घेत असून जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वत: ला वेगळे ठेवावे आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध असल्याचे आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमघ्ये म्हटले आहे.


त्याचबरोबर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनीही दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. माझी कोरोना चाचणी आज पुन्हा पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली आहे. याआधी १ मार्चला श्रीकांत शिंदे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. महिन्याभरानंतरच त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. श्रीकांत शिंदे यांना याआधी १ मार्च रोजी पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.