तब्बल 47 लाखांचा झाला एक Bitcoin


नवी दिल्ली : या आधीच्या किंमतीचे सर्व विक्रम क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनने मोडीत काढले आहेत. एका बिटकॉईनची किंमत मंगळवारी 62,575 डॉलर म्हणजे जवळपास 47 लाखांवर गेल्यामुळे बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल झाले आहेत. एका बिटकॉईनची किंमत केवळ एकाच वर्षापूर्वी साडेतीन लाखाच्या जवळपास होती. आता त्यात जवळपास 13 पट वाढ झाली आहे.

जागतिक अर्थव्यवसस्थेत कोरोनाच्या काळात मंदी असताना बिटकॉईनची किंमत मात्र सातत्याने वाढत राहिली. जगातील अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी या काळात बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केली. यामध्ये टेस्लाच्या एलॉन मस्क यांनीही 1.5 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. त्यानंतर बिटकॉईनच्या किंमतीत वेगाने वाढ झाल्याचे दिसून आले. तसेच बीएनवाय मेलन, मास्टरकार्ड या कंपन्यांनीही बिटकॉईनमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

बिटकॉईनमध्ये जगभरातील अनेक देश गुंतवणूक करत असताना भारतात अजून त्याला परवानगी देण्यात आली नाही. सध्याचे कायदे हे क्रिप्टोकरन्सीच्या वापरासंबंधात अपूर्ण आहेत, त्यामधील संदिग्ध गोष्टींचा सामना करण्यास ते पुरेसे नाहीत. क्रिप्टोकरन्सीच्या वापराबाबत निश्चित असे नियम आरबीआय आणि सेबी यांसारख्या नियामक मंडळांकडे नसल्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या वापरावर थेट नियंत्रण ठेवता येत नाही. या संबंधी लवकरच केंद्र सरकार संसदेत विधेयक आणेल, असे संसदेत केंद्र सरकारच्या वतीने सागण्यात आले आहे. दरम्यान बिटकॉइनसारख्या व्हर्च्युअल करन्सीच्या वापरावर आरबीआयने 2018 साली बंदी घातली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने ती बंदी उठवली होती.