कोरोनाकाळात इमर्जन्सी पॅरोलवर बाहेर आलेले तिहार जेलचे 3468 कैदी गायब


नवी दिल्ली : देशभरातील अनेक तुरुंगातील कैद्यांची कोरोनाच्या काळात चांदी झाली होती. तुरुंगात गर्दी होऊ नये आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अनेक कैद्यांना इमर्जन्सी पॅरोलवर सोडण्यात आले होते. 6,740 कैद्यांची अशा प्रकारे दिल्लीच्या तिहार जेलमधूनही इमर्जन्सी पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. आता त्यापैकी 3,468 कैद्यांचा कोणताही तपास लागत नाही. सध्या ते कुठे आहेत याची कोणतीही माहिती पोलिसांना मिळत नसल्यामुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे तिहार जेलच्या प्रशासनाने आता या कैद्यांना पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांकडे मदत मागितली आहे.

तिहार जेलच्या काही कैद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, तर काही कैदी स्वतःहून हजर होत आहेत. गायब असलेल्या कैद्यांपैकी काही कैद्यांना न्यायालयाचा नियमित जामीन मिळाला असल्याने त्यांनी प्रशासनासमोर आत्मसमर्पण केले नाही. पण ही संख्या अत्यंत कमी असल्यामुळे आता गायब असलेल्या या कैद्यांना कसे पकडायचे हा प्रश्न तिहार जेल प्रशासन आणि दिल्ली पोलिसांना पडला आहे. आता या गायब असलेल्या कैद्यांची संपूर्ण माहिती तिहार जेल प्रशासन घेत आहे.

कोरोनाच्या प्रसाराच्या सुरुवातीच्या काळात गेल्या वर्षी देशभरात कोरोनाला रोखण्याचे मोठे आव्हान होते. मोठ्या संख्येने कैदी तिहार जेलमध्येही एकत्र राहत असल्याने त्यांना कोरोनाची ल लागण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना इमर्जन्सी पॅरोल देण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार 6,740 कैद्यांची इमर्जन्सी पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. आता त्यापैकी 3468 कैद्यांचा कोणताही माग लागत नाही.