हार्ट सर्जरी नंतर गोल्फ मैदानावर परतला कपिल

टीम इंडियाचा माजी कप्तान आणि भारताला पहिला वर्ल्ड कप मिळवून देणारा जादूगार कपिल देव याच्यावर ऑक्टोबर मध्ये हृदय शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता तो परत गोल्फ मैदानावर परतला आहे. यावेळी त्याने टीम इंडिया मधील वेगवान गोलंदाजांच्या आक्रमक भूमिकेचे विशेष कौतुक केले आहे.

कपिल म्हणाला, २०-३० वर्षापूर्वी भारताकडे एकापेक्षा एक सरस आक्रमक गोलंदाज असतील ही उमेद नव्हती. आमचे वेगवान गोलंदाज जगात अव्वल कामगिरी बजावत आहेत हे पाहून फार आनंद होतोय. जसप्रीत, मोहम्मद शमी, भुवनेश्वर यांचे कौतुक करतानाच कपिलने हार्दिक पांड्या बद्दल विशेष अपेक्षा असल्याचे सांगितले. कपिल म्हणाला जेव्हा तो क्रिकेट खेळत होता तेव्हा वेगवान गोलंदाजांची वानवा होती. आता अनेक उत्तम दर्जाचे वेगवान गोलंदाज आपल्याकडे आहेत. पहिले तिघे खेळले नाहीत तरी पुढचे तिघे सामना जिंकून दाखवू शकतील अशी आताची परिस्थिती आहे.

कपिल देवने १९९४ मध्ये क्रिकेट संन्यास घेतल्यापासून टीम इंडियाने वेगवान गोलंदाजांचा शोध सुरु ठेवला होता. हार्दिक पांड्याने ती कमी पुरी केल्याचे सांगून कपिल म्हणतो, त्याला अजून खूप मोठा प्रवास करायचा आहे. त्याचे कौशल्य चांगले आहे पण फिटनेस कडे त्याने लक्ष द्यायला हवे. करोना विषयी बोलताना कपिल म्हणाला, करोनाने आपल्याला खूप काही शिकविले आहे. त्यामुळे करोना कडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे.