इजिप्त मध्ये २९ वर्षानंतर डागली गेली ऐतिहासिक तोफ

मुस्लीम समाजाचा पवित्र महिना रमजानची सुरवात झाली आहे. इजिप्त मध्ये या वर्षी २९ वर्षांच्या कालावधी नंतर इतिहासिक तोफ रमजानचा उपास सुटण्याची वेळ म्हणून डागली गेली. मंगळवारी सूर्यास्ताच्या वेळी ही तोफ डागण्यात आली आणि आता रोजे संपेपर्यंत रोज उपवास सोडण्याच्या वेळी ती डागली जाणार आहे. १९९२ मध्ये ही तोफ शेवटची डागली गेली होती.

इजिप्तची राजधानी कैरो येथे ही तोफ डागण्याची परंपरा गेली कित्येक शतके पाळली जात होती. सालाह- अल- आयुबी या प्रतिष्ठित गडावर ही तोफ असून त्यासंबंधी जी कागदपत्रे उपलब्ध आहेत त्यानुसार १४६० पासून ही तोफ रमजान उपवास सोडण्याच्या वेळी डागली जात असे. १४६० मध्ये ही तोफ ममलुक- सुल्तान सफ अलादिन खुशाकदम याला भेट म्हणून मिळाली होती. त्याने ही तोफ खरेच उडते काय याची चाचणी घेण्याचे आदेश दिले होते.

इजिप्तने पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी अलीकडे अनेक ऐतिहासिक स्थळे विकसित करण्याचे पाउल उचलले आहे. ही तोफ याच योजनेचा एक भाग म्हणून रमझान मध्ये रोज डागली जाणार आहे. या तोफेविषयी अनेक कहाण्या सांगितल्या जातात. पुन्हा वापरात आणण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करून ती लेझर युक्त केली गेल्याचे पुरातन अवशेष विभागाचे महासचिव मुस्तफा वाजीरी यांनी सांगितले.