यंदा गुलाबजामून खजुराला मोठी मागणी

रमजान महिन्यात अनेक मुस्लीम बांधव रोजे पाळतात. या काळात खजुराला मोठी मागणी असते. रमजानचा रोजा खजूर खाउन सोडण्याची प्रथा आहे. आयुर्वेदात खजूर रोगप्रतिकार शक्ती वाढविणारा, शरीराला चुस्ती देणारा मानला गेला आहे. रमजान महिन्यात खजूर हे पवित्र फळ म्हणून सेवन केले जाते. प्राचीन काळापासून रमजानच्या काळात सहज मिळणारे हे एकच फळ होते म्हणून त्याला पवित्र मानले जाते. खजूर सेवनाने दिवसभराचा थकवा दूर होतो आणि शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.

रमजानच्या निमित्ताने बाजारात अनेक प्रकारचे खजूर विक्रीसाठी आले असून यंदा गुलाबजामून खजूराला मोठी मागणी आहे. हा खजूर इतका नरम आहे की तोंडात दात नसलेल्या बालकापासून ते १०० वर्षाच्या माणसापर्यंत सर्वजण तो सहज खाऊ शकतात. तोंडात घालताच हा खजूर विरघळतो.

बाजारात अनेक प्रकारचे खजूर उपलब्ध आहेत. जगात ३ हजार प्रकारचे खजूर मिळतात. भारतात खजुराचे उत्पादन फारच मोजके आहे. पण खाडी देशात खजूर हे मुख्य उत्पादन आहे. सौदीतून येणारा अजवा खजूर त्याच्या गोडव्यामुळे विशेष प्रसिद्ध आहे. मधुमेही सुद्धा हा खजूर खाऊ शकतात. या खजूराला नेहमीच मागणी असते आणि तो महाग सुद्धा आहे. साधारण १ हजार रुपये किलो असा त्याचा भाव आहे.

बसरा खजूर सुद्धा ग्राहकांची पसंती आहे. हा खजूर स्वस्त पण पौष्टिक आहे. साधारण ८० रुपये किलोने तो मिळतो आणि साखरेसारखा गोड असतो. हा खजूर कडक असतो पण तो ताकद देणारा आहे.