बॉलीवूड मधील नामवंत खलनायकांच्या कन्या

बॉलीवूड मध्ये सर्व प्रतिष्ठा हिरोला मिळते. पण खलनायक किंवा व्हिलन शिवाय या हिरोंचा विजय काय कामाचा? बॉलीवूडने अनेक गुणी खलनायक दिले आहेत. विविध रुपात हे खलनायक प्रेक्षकांना दिसले आहेत आणि त्यातील कित्येकांची भीती अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे. अर्थात हे खलनायक प्रतिभावान आहेत हे कुणीच नाकारणार नाही. खलनायक कुणालाच आवडत नाहीत हे खरे असले तरी तीही माणसेच असतात आणि त्यांनाही चारचौघांसारखे कुटुंब असते.

अश्याच काही गाजलेल्या खलनायकांच्या कन्या काय करतात याची माहिती आपण येथे घेणार आहोत. यातील सर्वात गाजलेली बाप लेकीची जोडी आहे शक्ती कपूर आणि श्रद्धा कपूर. वडील खलनायक म्हणून कामे करत असताना श्रद्धा बॉलीवूडमधली आघाडीची अभिनेत्री बनली आहे.

शान मधील शाकाल फेम कुलभूषण खरबंदा हा असाच गुणी कलाकार. त्याची मुलगी श्रुती खरबंदा मात्र चित्रपट सृष्टी पासून दूर आहे पण ती सोशल मीडियावर खुपच सक्रीय आहे. अमरीश पुरी आज आपल्यात हयात नाहीत. मात्र त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यांची कन्या नम्रता सिनेमात नाही मात्र ती फॅशन डिझायनर म्हणून काम करते.

शोलेतून चित्रपट प्रवेश केलेला गब्बर उर्फ अमजद खान यांची कन्या अह्लम हिने काही चित्रपट केले आहेत मात्र तिची पहिली पसंती नाटक आहे. आणखी एक खलनायक रणजित बेदी. त्यांचा दुष्टपण त्यांच्या डोळ्यातूनच दिसत असे. त्यांची कन्या दिव्यंका प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे.