थोडक्यात आटोपणार बोरीस जॉन्सन यांचा भारत दौरा

ब्रिटीश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या भारत दौऱ्याचा कालावधी देशात वाढत असलेल्या करोना प्रकोपामुळे कमी केला गेला असल्याचे १० डाउनिंग स्ट्रीट कडून जाहीर केले गेले आहे. जॉन्सन २६ एप्रिल रोजी भारतात येत असून याच दिवशी त्यांच्या सर्व महत्वाच्या बैठका घेतल्या जाणार आहेत. जॉन्सन आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधासंबंधित चर्चा होईल आणि भारतातील प्रमुख उद्योगपतीं बरोबरच्या चर्चेला प्राधान्य दिले जाणार आहे असे समजते.

यापूर्वी बोरीस २६ जानेवारी २०२१ च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येणार होते पण त्यावेळी युके मध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याने हा दौरा रद्द केला गेला होता. ५६ वर्षीय बोरीस यांनाही करोनाचा संसर्ग झाला होता आणि तीन दिवस त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले गेले होते. त्यानंतर बोरीस यांनी लवकरच भारत भेटीवर येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार हा दौरा आयोजित केला गेला होता. या दौऱ्यात बोरीस यांनी दिल्ली शिवाय मुंबई, पुणे, बंगलोर आणि चेन्नईला भेट देण्याचे ठरविले होते. पण भारतात कोविड परिस्थिती अतिशय भयानक बनल्याने बोरीस यांची भेट दिल्ली पुरती मर्यादित केली गेली आहे.

अर्थात दौरा कालावधी कमी करण्याचा निर्णय भारत सरकारशी चर्चेनंतर घेतला गेल्याचे बोरीस यांच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. या वर्षात होत असलेल्या जी ७ परिषदेचे यजमानपद ब्रिटन कडे असून या समिट साठी पंतप्रधान मोदी यांना विशेष आमंत्रण दिले गेले आहे.