गिनीज बुक रेकॉर्ड नोंदविलेला ससा हरवला, माहिती देणाऱ्यास १ लाखाचे बक्षीस

जगातील सर्वात मोठा ससा म्हणून गिनीज बुक मध्ये नाव नोंदविलेला ११ वर्षे वयाचा ससा शनिवारी चोरीस गेला असून त्यामुळे हवालदिल झालेल्या त्याच्या मालकिणीने सशाची माहिती देणाऱ्यास १ हजार पौंड म्हणजे १ लाख रुपये इनाम जाहीर केले आहे. ससा चोरीस गेल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदविली गेली आहे. पोलीस या सशाचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पूर्वी मॉडेल म्हणून काम करणारी एनेट एडवर्ड ही गेली अनेक वर्षे सशांचे ब्रिडिंग करते. तिच्या घरी २०१० साली एक ससा जन्माला आला आणि त्याचे नामकरण डेरीयस असे केले गेले. हा ससा १२९ सेंटीमीटर म्हणजे ४ फुट ५ इंच लांबीचा झाला आणि त्याचे नाव जगातील सर्वात मोठा ससा म्हणून गीनिज बुक मध्ये रजिस्टर झाले. आता हा ससा चोरीला गेला आहे. एनेटने चोरांना ससा परत आणून देण्याची विनंती ट्विटर वरून केली असून ती लिहिते, डेरीयस चोरीला गेला तो तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस आहे. ती म्हणते, डेरीयस म्हातारा झाला आहे, त्याचा आता ब्रिडिंग साठी उपयोग नाही. त्यामुळे ज्यांनी कुणी त्याला नेले असेल त्यांनी तो परत करावा.

डेरीयसचे पूर्वी टीव्ही वर अनेक कार्यक्रम झाले आहेत मात्र अलीकडे त्याचे वय झाल्याने अश्या कार्यक्रमात एनेट त्याला पाठवत नव्हती. डेरीयसचे वजन २२ किलो असून वर्षाला त्याला चार हजार गाजरे आहार म्हणून लागतात.