धक्कादायक माहिती; आळशी लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा सर्वाधिक धोका


नवी दिल्ली – आपण आपल्या शालेय जीवनात आळस हा माणसांचा शत्रू असल्याचे ऐकले आहे. माणसाच्या प्रगतीतील आळस हा सर्वात मोठा अडथळा असल्याचे आपण अनेकदा ऐकले देखील आहे. पण, ही आळशीवृत्तीच आता कोरोना मृत्यूचे कारण ठरू शकणार आहे. कोरोनामुळे आळशी लोकांना मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याचे आता समोर आले आहे. हे निष्कर्ष एका अभ्यासातून काढण्यात आले असून, हा आळशी लोकांसाठी धोक्याचा इशाराच आहे.

कोरोनाची तीव्र लक्षणे व्यायाम आणि शारीरिक हालचाली कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये असून, कोरोनामुळे अशा लोकांना मृत्यू होण्याचा धोका जास्त आहे. ज्या व्यक्तींनी कोरोनाची साथ येण्याच्या दोन वर्ष आधीपासून व्यायाम करणे सोडून दिले. त्याचबरोबर त्यांच्या शारीरिक हालचाली कमी आहेत. त्यांना कोरोनानंतर रुग्णालयात दाखल करावे लागत असून, आयसीयूमध्ये त्यांना भरती करावे लागत असल्याचे नव्या अभ्यासात दिसून आले आहे. हे संशोधन ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोटर्स मेडिसीन या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

कोरोनाचा संसर्ग धुम्रपान, लठ्ठपणा वा उच्च रक्तदाब यांच्या तुलनेत शारीरिक हालचाल न करणाऱ्यांना होण्याचा आणि मृत्यूचा धोका अधिक असल्याचे या अभ्यासाच्या निष्कर्षात नमूद करण्यात आले आहे. ५० हजार कोरोनाबाधितांचा या संशोधनासाठी अभ्यास करण्यात आला. आतापर्यंत धुम्रपान, लठ्ठपणा वा उच्च रक्तदाब असलेल्यांना कोरोना संसर्गाचा आणि कोरोनामुळे जीविताचा धोका अधिक असल्याचे सांगितले जात होते.

पण आता यापेक्षाही शारीरिक हालचाल न करणे, यामुळे कोरोना होण्याचा आणि मृत्यू ओढवण्याचा धोका जास्त असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. ज्या व्यक्ती व्यायाम करत नव्हत्या. जे शारीरिक हालचालीही फार करत नव्हते, कोरोनाची लक्षणे अशा ४८ हजार४४० लोकांमध्ये अधिक दिसून आली. यात काहींना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर काहींना आयसीयूमध्ये भरती करावे लागले, यामुळे काहींचा मृत्यू झाला. हा अभ्यास जानेवारी आणि ऑक्टोबर २०२० दरम्यान अमेरिकेत करण्यात आला.