महाविकास आघाडी सरकारच्या धोरणामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती – चंद्रकांत पाटील


पुणे – मंगळवारी राज्यातील जनतेशी संवाद साधताना १५ दिवसांच्या संचारबंदीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली. ही संचारबंदी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच साखळी तोडण्यासाठी जाहीर करत असल्याचे सांगत त्यांनी सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि मदतीची माहिती दिली. दरम्यान राज्य सरकारवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावरुन जोरदार टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू करताना गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसल्याचे ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी राज्यात निर्बंधांची घोषणा करताना सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले, पण त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. ज्या गरीब कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत स्वस्तात धान्य मिळते, त्यांना दर महिना प्रतिकुटुंब केवळ १०५ रुपये त्यासाठी खर्च करावे लागतात. या कुटुंबांना राज्य सरकारने महिनाभरासाठी मोफत धान्य देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात प्रतिकुटुंब १०५ रुपयांचाच भार सोसलेला आहे.

साधारणपणे दरमहा सरासरी दहा हजार रुपये रिक्षाचालक कमवत असताना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी अवघ्या दीड हजार रुपयांची घोषणाही अशीच तोंडाला पाने पुसणारी आहे. एकूणच हातावर पोट असणाऱ्यांना मदत करण्यासाठीच्या घोषणा फसव्या असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, सर्व काळजी घेऊन शक्य ते उद्योगधंदे चालू ठेवण्यास परवानगी देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. परंतु, त्यांनी व्यापाराविषयी काहीही उल्लेख केला नाही. राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्याचा आदेश असल्याने त्याचा जबरदस्त फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे.

खरे तर व्यापाऱ्यांना पुरेशी काळजी घेऊन काम करण्याची परवानगी द्यायला हवी होती. केवळ निर्बंध लादायचे आणि फारशी मदतही करायची नाही या महाविकास आघाडी सरकारच्या धोरणामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.